
हॉटेल गल्फ दरबार मागे 7 ते 8 हजारांचे अनधिकृत बांधकाम
पालिकेला मात्र अद्याप ते बांधकाम तोडण्यासाठी मुहूर्त सापडला नाही !; प्र.सहा.आयुक्त गणेश पाटील झोपा काढता का?
नालासोपारा : प्रतिनिधी :
वालीव विभागातील कामण परिसरात एका अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपायुक्त अजित मुठे यांच्यावर भूमाफिया यांनी हल्ला चढवला त्यानंतर दुखावल्या गेलेल्या उपायुक्त अजित मुठे यांनी अनधिकृत बांधकामांची मिजास उतरवली. आश्चर्य या बाबतीत वाटते की, गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली अनधिकृत बांधकामे ढीगभर तक्रारी देऊनही अधिकाऱ्यांना कारवाईसाठी जाग येत नाही. मात्र हीच बांधकामे त्यांच्या मुळावर उठतात तेव्हा हे अधिकारी कारवाईसाठी पेटून उठतात. सर्वसामान्य नागरिकांचे संसार देशोधडीला लावून त्यावर लोण्याचा गोळा मटकावणाऱ्या या अधिकाऱ्यांना अनधिकृत बांधकामांवर म्हणूनच कारवाईसाठी लकवा मारलेला असतो.
दरम्यान, अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या पेल्हार विभागात देखील हीच गत आहे. पेल्हारमधील सागर इस्टेट या परिसरातील गल्फ दरबार या हॉटेलमागे सध्या अनधिकृत बांधकामे सुमारे 7 ते 8 हजार अशा बेताने वाढली आहेत. त्यावर कारवाई व्हावी म्हणून पत्रकाराने पालिका अधिकाऱ्यांच्या मर्मावर घाव घातले आहेत. मात्र तरीही अधिकारी कारवाईसाठी जागचे हलायला तयार नाहीत. पेल्हार विभागाचे भ्रष्ट व वादग्रस्त
अधिकारी गणेश पाटील यांची कर आर्थिक गुन्हे शाखा व लाच लुचपत विभागाकडून नीट चौकशी केली तर या अधिकाऱ्याचे प्रताप उजेडात येतील. या
अधिकाऱ्याला कर घोटाळ्याप्रकरणी सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतरही सदर अधिकाऱ्याच्या तोंडात सोन्याचा चमचा देऊन त्यांच्यावर मेहेरबानी दाखवण्याचा एकपात्री कार्यक्रम पालिका प्रशासनाने राबवला आहे. दरम्यान, पेल्हारमधील अनधिकृत बांधकामे वाढीस लागलेली असताना त्यात हॉटेल गुल्फ दरबार मागील अनधिकृत बांधकाम तोडण्याबाबत पत्रकार पाठपुरावा करत असताना महापालिकेचा पेल्हार विभाग मुहूर्ताची वाट पाहत बसला आहे. यावरून भूमाफिया इर्शाद याच्या सदर अनधिकृत बांधकामाला पेल्हार विभागाचा पाठिंबा असल्याचा आरोप होत आहे.