
महापालिकेच्या निर्लज्जम सदा सुखी या तत्वामुळे अनधिकृत बांधकामांचे फाजील लाड वाढले !
कामण-देवदळ-सागपाडा परिसरातील अनधिकृत बांधकामांवर अति.आयुक्त संजय हेरवाडे यांची कृपादृष्टी !


वाचा पुढील अंकात हा संजू दलाल कोण ते !!
वसई : प्रतिनिधी :
अनधिकृत बांधकामांच्या मोहजाळात पालिका अधिकाऱ्यांनी स्वत:ला पांढरपेशे राखण्यात अनेक दलालांच्या मध्यस्थीतून यश मिळवले असले तरी कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही. हेच सत्य सध्या अनधिकृत बांधकामांच्या माध्यमातून होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील आर्थिक वसुल्यांतून समोर आले आहे. पालिकेचे वरीष्ठ अधिकारी हे अनधिकृत बांधकामांतून वसुल्या करणारे मास्टरमाईंड असून त्यांनी प्रभागाप्रभागात पेरलेल्या वसुली एजंटांच्या जीवावर हे अधिकारी स्वत:चे बँक बॅलन्स वाढवत बसले आहेत. दरम्यान, महापालिकेचे दक्षिण विभागाचे अतिरीक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या वसुलीबाज धोरणामुळे सध्या वसई वालीव विभागातील कामण-देवदळ, सागपाडा या परिसरातील अनधिकृत बांधकामं वाढीस लागली असून या अनधिकृत बांधकामांतून महापालिकेच्या लाखो रूपयांच्या महसुलाचे नुकसान होत असून केवळ अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळेच सदर परिसरातील अनधिकृत बांधकामं सहीसलामत असल्याचे चित्र दिसून येते.
कामण-देवदळ, सागपाडा परिसरात झालेल्या मोठ्या प्रमाणावरील अनधिकृत बांधकामांच्या तळी उचलण्यासाठी दक्षिण विभागाचे अतिरीक्त आयुक्त संजय हेरवाडे हे पुरेपूर वसुलीच्या मैदानात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अर्थातच वसई पूर्वेतील कामण-देवदळ, सागपाडा परिसरातील भूमाफिया गुप्ता याच्या बांधकामातून कोण्या संजू नामक दलालाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या विभागात आर्थिक वसुल्या होत आहेत. हा संजू नामक दलाल कोण? याबाबत आपण पुढील अंकात त्याबाबत धांडोळा घेत या दलालाच्या कुंडलीचा चेहरा समोर आणणार आहोत. मात्र सध्या परिसरात वाढत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर अशाप्रकारे वरदहस्त ठेवला जात असल्यानेच त्या अनधिकृत बांधकामांचा सुपडा साफ करण्याची हिंमत वालीव विभागाच्या अधिकाऱ्यांत उरली नाही. हे अधिकारी केवळ पांढऱ्या हत्तीसारखे पोसले जात असून त्यांच्या हातात हांजी हांजी करण्यापलिकडे काही उरले नाही.
तसेच कामणच्या भूमाफिया गुप्ता याच्या अनधिकृत बांधकामांतून राजरोस वसुल्या करणाऱ्या संजू नामक दलालाला स्वत: दक्षिण विभागाचे अतिरीक्त आयुक्त संजय हेरवाडे हे खतपाणी घालत असल्याने भूमाफिया गुप्ता याच्या अनधिकृत बांधकामांचा कामण परिसरात दबदबा आहे. अर्थातच पालिकेच्या लाचार अधिकाऱ्यांच्या हपापलेल्या कारभारावर पालिका प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अर्थकारणाचा डोलारा सध्या उभा असल्याचे चित्र आहे.