
दिनांक : २७ /०८/२०२४
कृपया प्रसिद्धीसाठी
प्रति
मा. संपादक/वृत्तपत्र प्रतिनिधी/प्रिंट मिडिया/
डिजिटल मिडिया/ इलेक्ट्रॉनिक मिडिया
यांसी
गाव मौजे धोवली सिटी सर्व्हे नं २२८०/अ या सर्व्हे नंबरमध्ये इमारतीचे बांधकाम करताना विकास आराखड्यातील १२ मीटरच्या मंजुर रस्त्यात अतिक्रमण करण्यात आले आहे. हा रस्ता वर्षानुवर्ष रमेदी येथील शनीमंदीराच्या समोरुन खोपवाडी गावात जाणारा रस्ता (पुर्वीची बिद) आहे. त्या रस्त्यावर एका विकासकाने उत्तर बाजुस एक इमारतीच्या बांधकामास सुरुवात केली. सदरहु इमारतीचे बांधकाम रस्त्यात असल्यामुळे त्यास अनधिकृत ठरविल्याची नोटीस तेथे लावण्यात आली होती. तदनंतर त्या इमारतीच्या बांधकामास VVCMC/TP/CC/VP-6365/452/20121-22 अन्वये बेकायदेशीरपणे बांधकाम परवानगी देण्यात आली
सदर इमारत हि मुळ विकास आराखड्यातील मंजुर १२ मीटरच्या रस्त्यामध्ये उभी आहे. सदरहु इमारतीस बेकायदेशीर बांधकाम परवानगी दिल्यामुळे त्या इमारतीच्या कायदेशीरपणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यातुन मार्ग काढण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेचे उपसंचालक नगररचना श्री. वाय एस रेड्डी यांनी नविन शक्कल लढवली. सदरहु रस्त्याची रुंदी प्रथम ९ मीटर करण्यात आली आणि एवढे करुनही अस्तित्वात असलेल्या रस्त्यामध्ये तो रस्ता बसत नसल्यामुळे सदरहु रस्ता हा रस्त्याच्या दक्षिण बाजुकडील भुमिपुत्रांच्या सिडको कडुन मान्यता मिळवुन रितसर बांधलेल्या घरामध्येच घुसवला आहे. त्यामुळे त्या घरात केवळ ६ फुट रुदींचा भाग वापरण्यासाठी शिल्लक राहणार आहे.
त्याचप्रमाणे पारनाका वसई येथुन निघुन हायवे पर्यंत जाणारा महात्मा गांधी मार्ग हा मुख्या रस्ता त्या रस्त्याच्या चिमाजी आप्पा मैदानासमोरील बाजुस असलेल्या सिटी सर्व्हे नं २४२३अ/१ब या सर्व्हे नंबरमध्ये VVCMC/TP/CC/VP-6863/498/2022-23 अन्वये एका इमारतीच्या विकासाचे काम सुरु आहे. सदरहु इमारतीचे बांधकाम लक्षात घेता हे बांधकाम मुख्य रस्त्यापासुन १० फुट अंतराच्या आतमध्ये असल्याचे दिसुन येते. या बांधकामामुळे आणि त्या इमारतीतील दुकानांच्या समोर भविष्यात उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे हा मुख्य रस्ता वाहनांसाठी आणि नागरिकांच्या येण्याजाण्यासाठी अत्यंत जिकरिचा होणार आहे. तसेच वसईत सुरु असलेले विकास काम, सनटेक सारखे मोठमोठे प्रकल्प यांची वाहने देखील याच रस्त्यावरुन जाणार आहेत त्यामुळे हा रस्ता भविष्यात वाहतुकीसाठी रुंद करणे आवश्यक व गरजेचे ठरणार आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणावर निर्बंध येणार आहेत.
याचप्रमाणे प्रभाग समिती ‘आय’ मध्ये मंजुर विकास आराखड्यातील अनेक रस्ते बदलण्याचे किंवा त्या रस्त्याच्या नियोजित जागेमध्ये इमारती बांधण्याची कामे सुरु आहेत. त्याकरीता नगररचना विभाग मंजुर विकास आराखड्यातील मंजुर नकाशाच्या अस्तित्वात बेकायदेशीपणे फेर बदल करित आहे. या सर्व फेर बदलांमुळे आणि रस्त्याला अडसर होणाऱ्या बांधकामामुळे भुमिपुत्रांच्या व सर्व वसईकरांचे आज रोजीचे आणि भविष्यातील परिवहन अतिशय कठिण व जिकरीचे होणार आहे.
मुक्त संचार हा जनतेचा मुलभुत अधिकार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले आणि भविष्यात आवश्यकता निर्माण होणारे सर्व रस्ते टिकवण्यासाठी आता वसईचे भुमिपुत्र व वसईकर जनता लढण्यास सज्ज होत आहे. खोपवाडी गावातील बाधीत ग्रामस्थ यांनी या लढ्यास सुरुवात केली असुन या लढ्याास सर्व वसईतुन उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी वसईच्या नागरिकांच्या शिष्टमंडळाला मा. आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका यांची भेट मिळावी म्हणुन ग्रामस्वराज्य अभियान संघटनेने आयुक्तांना रितसर पत्र दिले आहे. आयुक्तांसोबतच्या या बैठकीत उपसंचालक नगररचना श्री. वाय एस रेड्डी हे उपसि्थत राहतील अशी व्यवस्था करण्याची आयुक्तांना विंनती केलेली आहे. आयुक्त लवकरात लवकर हि भेट देतील अशी अपेक्षा आहे. या भेटीमध्ये प्रभाग समिती ‘आय’ मधील नियोजित विकास आराखड्यातील सर्व रस्ते हे आहेत त्याच स्थितीत ठेवणे आणि जे नियोजित रस्ते करणे आवश्यक आहे ते रस्ते तयार करुन नागरिकांना प्रवाससाठी मोकळे करण्यात यावे अशी मागणी करण्यात येणार आहे. तसेच खोपवाडी मधील स्थलांतर करण्यात आलेला रस्ता हा होता त्याच स्थितीत ठेवणे आणि तो अतिक्रमण मुक्त करणे तसेच चिमाजी आप्पा मैदानासमोरील सुरु असलेले इमारतीचे बांधकाम ज्यामुळे वाहतुकीस अडथळा येऊन भविष्यात रस्ता रुंदीकरणाचा मार्ग बंद होणार आहे त्या बांधकामास तात्काळ स्थगिती देण्यात यावी या प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत. यावर सविस्तर चर्चा होऊन तोडगा न निघाल्यास भुमिपुत्र व वसईकर हे तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत व त्याची संपुर्ण जबाबदारी महापालिकेची राहिल.