
वसई (प्रतिनिधी) वसईचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री पद्मश्री कै.भाऊसाहेब वर्तक यांचे दिनांक ७ ऑक्टोबर १९९८ साली देहावसान झाले त्याला आज २६ वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त काँग्रेस भवन येथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्टचे विश्वस्त मोहन घरत आणि वसई विरार शहर जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी कै. भाऊसाहेबांच्या तसबीरीस पुष्पहार वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
याप्रसंगी त्यांच्या कार्याबद्दल माहिती विषद करताना श्री मोहन घरत म्हणाले की काँग्रेसच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील पडत्या काळात वसईचे थोर लोकनेते कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांनी विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या अन्न व पुरवठा मंत्री असताना अन्न धान्याच्या तीव्र टंचाईच्या काळात या खात्याची जबाबदारी टीका सहन करत मोठ्या धैर्याने सांभाळली. भाऊसाहेबांच्या कार्याबद्दल सांगण्यासारखे खूप आहे. विशेषतः माननीय कै. यशवंतराव चव्हाण यांच्या आदेशावर स्व. भाऊसाहेबांनी काँग्रेसचे मुख्य कार्यालय मुंबईत उभारण्यासाठी अविरत परिश्रम घेतले. त्यामुळे दादर, मुंबई येथे टिळक भवन हे प्रशस्त कार्यालय स्थापन झाले.
राजकीय सामाजिक कार्यातील समस्यांना त्यांनी न डगमगता तोंड दिले आणि या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला.
अशा या जनताभिमुख नेतृत्वाला श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते न्याप डायस, वसई शहर ब्लॉक अध्यक्ष बिना फुत्यार्डो , कुलदीप वर्तक असे अनेक मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते रघुवीर नायक ,अजीम शेख , कुंदन घरत तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी स्व. भाऊसाहेबांच्या तसबीरीस पुष्पे वाहून श्रद्धांजली अर्पण केली.