आयुक्त अनिलकुमार पवार तुम्ही फक्त कागदी घोडेच नाचवू नका?

पेल्हार परिसरातील नागरिकांचा संतापजनक सवाल, अतिरीक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त अजित मुठे यांचाही बेजबाबदार कारभार

वसई : (प्रतिनिधी) : वसईत विरार शहर महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराचा फटका सार्वजनिक सुविधा, लोकजीवन आणि एकूणच पर्यावरणाला बसू लागला आहे. अनधिकृत बांधकामांचे वाढते साम्रज्य लक्षात घेता, पालिका आयुक्त अनिलकुमार पवार अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे कागदी घोडे नाचवण्यापलिकडे कोणतेच काम करत नसल्याने नागरिकांत नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्याचाच फटका सर्वसामान्य नागरिकांची अनधिकृत बांधकामांत फसवणूक होणे, पालिकेचा लाखोंचा महसूल वाया जाणे आदी प्रकार पालिकेच्या हद्दीत घडू लागले आहेत. अशातच आता तकलादू अनधिकृत बांधकामात निरपराध नागरिकांचा जीव जात असल्याच्या घटना घडत असताना आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरीक्त आयुक्त संजय हेरवाडे तसेच उपायुक्त अजित मुठे हे अनधिकृत बांधकामांत स्वत:चे आर्थिक उखळ पांढरे करत बसले आहेत.
दरम्यान, पेल्हार विभागात हॉटेल गल्फ दरबारच्या मागे सुमारे 7 ते 8 हजार चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम झाले आहे. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास पेल्हार विभागाला अद्याप जाग आलेली नाही. या विभागाचे अधिकारी यांनी इतर अधिकाऱ्यांप्रमाणे कारभार न रेटता थेट अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवणे गरजेचे असताना पालिकेने त्याकडे काणाडोळा केला आहे. स्वत: आयुक्त अनिलकुमार पवार हे अनधिकृत बांधकामांवर जातीने लक्ष देण्यास कचरत असल्याने त्यांच्या कारभारावर संशय व्यक्त होऊ लागला आहे. आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण आणण्यासाठी जे पथक तैनात केले आहे. ते 12 उपायुक्तांचे पथक अनधिकृत बांधकामांवर करण्यात धन्यता मानत नसल्याने अनधिकृत बांधकामांचा व्याप वाढला आहे. दरम्यान, पेल्हारमधील हॉटेल गुल्फ दरबारमागील अनधिकृत बांधकामांवर पेल्हार विभागाने काणाडोळा केल्याने त्यांच्यादेखील कार्यपद्धतीवर संशय घेण्यास वातावरण आहे. आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरीक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त अजित मुठे यांनी कनिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांना केवळ वसुल्यांच्या कामात गुंतवले असून स्वत: मात्र आर्थिक बिदाग्या ओरबाडत बसले आहेत. त्यांच्या या कामावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पेल्हार विभागातील वाकणपाडा विभागात अनधिकृत बांधकामाची भिंत कोसळून त्याखाली दबून एका निरपराध मजूराचा बळी गेला होता. त्यानंतरही पालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांचा तमाशा वाढला आहे. या अनधिकृत बांधकामांवर कारवाया करण्याऐवजी त्यातून मोठ्या प्रमाणात वसुल्या केल्या जात आहेत. पेल्हारच्या हॉटेल गल्फ दरबारमागे झालेल्या अनधिकृत बांधकामावर आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरीक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त अजित मुठे यांनी तात्काळ कारवाया करून संबंधित भूमाफियावर एमआरटीपी व फौजदारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *