
‘त्या’ कनिष्ठ अभियंत्यांच्या निलंबनास कारणीभूत ठरलेल्या बांधकाम माफियाचा ‘पंखा फास्ट’
अनधिकृत बांधकाम करूनही बांधकाम माफिया मोकाट;पालिकेचे कनिष्ठ अभियंते ठरले बळीचे बकरे?
बांधकाम माफियाला वाचवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनीच दिला कनिष्ठ अभियंत्यांचा बळी?
विरार(प्रतिनिधी)-दोन महिन्यांपूर्वी वसई विरार महापालिकेच्या पेल्हार तसेच चंदनसार प्रभागातील ठेका अभियंते भीम रेड्डी व मिलिंद शिरसाठ यांची पंखा फास्ट या पब मधील एका बांधकाम माफिया सोबतची चित्रफीत व्हायरल झाली होती.या व्हायरल चित्रफिती मध्ये हे दोन्ही अभियंते पंखा फास्ट नामक पब मध्ये पार्टी करताना दिसत होते.ही चित्रफित व्हायरल होताच खळबळ उडाली होती. त्याची गंभीर दखल महापालिकेने घेतली आणि या दोघांची पालिकेतून हकालपट्टी करत निलंबनाची कारवाई केली होती.पालिकेची प्रतिमा मलिन करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला होता.विशेष म्हणजे या दोन्ही अभियंत्यांच्या निलंबनास कारणीभूत ठरलेल्या इर्शाद खान नामक बांधकाम माफियाचा मात्र ‘पंखा फास्ट’ असल्याचे चित्र पहावयास मिळत असून त्याचे पालिका क्षेत्रातील सागर इस्टेट मध्ये
लाखो चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम आजही राजरोसपणे सुरू आहे.शिवाय या बांधकाम माफियाने नैसर्गिक नाल्याच्या पात्रातही अतिक्रमण करण्याचा पराक्रम केला आहे.असे असताना या बांधकाम माफिया विरोधात पेल्हार वासीयांकडून कारवाईची अपेक्षा होती.परंतु या बांधकाम माफियालाच वाचविण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.त्यामुळे निलंबित झालेले कनिष्ठ अभियंते हे बळीचे बकरे ठरले असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.तसेच बांधकाम माफियाला वाचवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनीच कनिष्ठ अभियंत्यांचा बळी दिल्याचे बोलले जात आहे.विशेष म्हणजे बांधकाम माफियांसोबत पार्टी केल्याने पालिकेने शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्या दोन्ही अभियंत्यांचे निलंबन करून आपण किती कार्यतत्पर असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. पण दुसरीकडे ज्या बांधकाम माफियाने ही पार्टी आयोजित केली होती, त्या इर्शाद खान या बांधकाम माफियाविरोधात आजपर्यंत कोणतीच कारवाई न केल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. सदरच्या बांधकाम माफियाचे पालिकेच्या पेल्हार प्रभागात जागोजागी अनधिकृत बांधकाम जोमाने सुरू आहे. परंतू पालिका प्रशासन इर्शाद खानच्या अनधिकृत बांधकामां विरोधात निष्काशन मोहीम राबविण्यास अपयशी ठरली आहे.
वसई विरार पालिकेचा पेल्हार प्रभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.मध्यंतरी या प्रभागातील वाकणपाडा परिसरात अनधिकृत बांधकामाची भिंत पडून झालेल्या दुर्घटनेत एका मजुरांचा मृत्यू झाला होता.परंतु या दुर्घटनेनंतरही पालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामा बाबत गांभीर्य घेतलेले नाही.विशेष म्हणजे या दुर्घटनेनंतर योगायोगाने दोन ठेका अभियंत्यांची एका बांधकाम माफियासोबतची पंखा फास्ट या पब मधील चित्रफीत व्हायरल झाली होती.त्यावेळी या चित्रफितीची दखल घेत दोन्ही ठेका अभियंत्यांना निलंबित केले होते. तसेच पेल्हार प्रभागासाठी पूर्णवेळ सहा.आयुक्त म्हणून आधी गणेश पाटील आणि आता ग्लिसन गोन्सालवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.परंतु पूर्णवेळ सहा.आयुक्त नियुक्त होऊनही पेल्हार प्रभागातील अनधिकृत बांधकामे थांबलेली नाहीत. उलट या प्रभागात अनधिकृत बांधकामाचा आलेख दुप्पटीने वाढला आहे.परिणामी
सामान्य मजुरांचे जाणारे बळी, तसेच पेल्हारमधील स्थानिक आदिवासी वस्ती असलेला पेल्हारचा परिसर पालिका अधिकारी, राजकारण्यांच्या मिलीभगतीमुळे भूमाफियांनी उद्ध्वस्त केला आहे.वास्तविक नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पेल्हारमधील १७ आदिवासी पाड्यांनी राज्याचे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त यांना पत्रव्यवहार करून लोकसभा निवडणुकीवर बहीष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, पेल्हार विभागातील पेल्हार गाव, डोंगरपाडा, वंगणपाडा, वर्तक वसाहत, जाबरपाडा, धांगडपाडा, सागपाडा, भिड्याचा पाडा, रानशेतपाडा, शिवेचा पाडा, गडगापाडा, वाण्याचा पाडा, वाकणपाडा, डोंगरीपाडा, वनोठा पाडा अशा १७ गावपाड्यांनी मतदानावर बहीष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. या परिसरात अनधिकृत बांधकामं मोठ्या पटीने भूमाफियांना करू दिली जात आहेत. त्यात स्थानिक आदिवासी नागरिक उध्वस्त होत आहे. याबाबत आदिवासीं बांधवांनी नाराजी व्यक्त केली होती.त्यावेळी पालिका प्रशासनाने तकलादू आश्वासन देऊन नाराज आदिवासी बांधवांना मतदान करण्यास राजी केले होते.परंतु निवडणूका संपताच पालिका प्रशासनाला येथील आदिवासी बांधवांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. याठिकाणी पुन्हां खुलेआम पणे सर्व नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामांचे दुकान बांधकाम माफिया व पालिका अधिकाऱ्यांनी मांडले असल्याचे पहावयास मिळत आहे.