वसई । वार्ताहर ः मागील मासिक सभेचे इतिवृत्त आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या सभेचा जमाखर्च नसल्यामुळे २८ ऑक्टोबरला घेण्यात आलेली मासिक सभा अखेर रद्द करण्याची नामुष्की सत्पाळा ग्रामपंचायतीवर ओढावली आहे.त्यामुळे सदस्यांनी संताप व्यक्त केला असून,याप्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
वसई च्या उत्तर भागात असलेल्या सत्पाळा ग्रामपंचायतीचा कारभार गेल्या कित्येक वर्षांपासून गाजत आहे.त्यात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे.गेल्या महिन्यात २७ तारखेला झालेल्या मासिक सभेचे इतिवृत्त आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या मासिक सभेचा जमाखर्च तयार नसताना २८ ऑक्टोबरला दुसरी सभा लावण्यात आली होती.त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी याप्रकरणी ग्रामपंचायतीला लेखी जाब विचारुन त्याचे उत्तर मागितले होते.तसेच मागील सभेला ग्रामसेवक उपस्थित नसल्यामुळे ही या सभेला उपस्थित राहिलेले ग्रामविकास अधिकारी नितीन राणे यांनीही सरपंच मॅडमला या बाबत विचारणा केल्यावर कॅशबुक किशोर पाटील यांनी न दिल्यामुळे जमाखर्च सादर करता आला नसल्याचे उत्तर त्यांनी दिले.
हे प्रकरण चांगलेच अंगाशी येणार असल्याचे ज्ञात झाल्यामुळे सरपंच मॅडमसह ग्रामसेवक ही ग्रामपंचायतीकडे फिरकलेच नाही.परिणामी मासिक सभा बरखास्त झाली.दरम्यान,मासिक सभेच्या दुस-या दिवशी कॅशबुक घेवून ग्रामसेवक ग्रामपंचायतीत हजर झाले.या प्रकरणी अधिक माहितीसाठी मागील सभेत उपस्थित राहिलेले ग्रामविकास अधिकारी नितीन राणे यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी फोन घेण्याचे टाळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *