
आंदोलनात वापरलेली पालखी आणि गणपतीची प्रतिमा पोलिसांच्या स्वाधीन…
शिवसेना आणि काँग्रेस गेली कुठे? जनतेला प्रश्न !

वसई, दि.2(वार्ताहर )
वसई विरार शहर महानगर पालिकेच्या रु. ११ करोड स्मशानभूमी घोटाळा प्रकरणी सतत चालू असलेल्या धरणे आंदोलन आणि पोलिसांची पालखी काढल्यानंतर माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी आंदोलनकर्त्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश
मोडल्याबद्दल, तसेच भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल केले. त्याबाबत जबाब नोंदण्यासाठी दि १ ऑगस्ट २०१९
रोजी माणिकपूर पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले असता, आंदोलकांनी तेथे ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक देऊन हुसकावण्यात आले होते.
परिणामी पोलीस स्टेशनला आंदोलनात वापरलेली पालखी आणि गणपतीची प्रतिमा देण्यासाठी, तसेच पोलिसांच्या दंडेलीचा निषेध म्हणून आज दिनांक २ ऑगस्ट २०१९ रोजी पुन्हा अंबाडी पोलीस चौकी पासून माणिकपूर पोलीस ठाण्यापर्यंत वाजत गाजत जाऊन
पालखी आणि गणपतीची प्रतिमा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली. तसेच जेष्ठ नागरिक असलेले “मी वसईकर अभियान” चे अध्यक्ष मिलिंद खानोलकर, ज्येष्ठ वकील ऍड.अशोक वर्मा, ऍड सुमित डोंगरे, ऍड अनिल चव्हाण आणि त्यांच्या सहकार्यांनी तोंडावर काळी फीत बांधून पोलीस स्टेशनसमोर भर पावसात सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उभ्यानेच आंदोलन सुरु ठेवले. खानोलकर यांनी महात्मा गांधी यांची प्रतिमा गळ्यामध्ये अडकवून अनोखे आंदोलन केले .
मिलिंद खानोलकर हे स्वतः शिवसेनेचे जिल्हा सचिव असून, तसेच त्यांच्या “मी वसईकर अभियाना”च्या सर्व उपक्रमात काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील सहभागी असतात. पाटील यांच्या प्रत्येक आंदोलनात खानोलकर यांचाही सहभाग असतो. विधानसभा निवडणुकीचे इच्छुक उमेदवार असलेले विजय पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन अलीकडेच खानोलकर यांच्या हस्ते झाले होते. मात्र गेले वीस दिवस चाललेल्या खानोलकर यांच्या या लोक प्रश्नावरील आंदोलनाकडे वसईतील एकही शिवसेना नेता किंवा काँग्रेसचे विजय पाटील जरा सुद्धा फिरकले नाहीत,या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
“ज्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवे होते त्यांना सोडून आमच्यावरच गुन्हे दाखल करण्याचा पराक्रम माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी केला आहे . आतापर्यंत वसईमध्ये जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही अनेक आंदोलने केली पण कोणत्याही पोलीस निरीक्षकाने आम्हास अशी अपमानास्पद वागणूक दिली नाही” अशी संतप्त प्रतिक्रिया मिलिंद खानोलकर यांनी दिली .