
नो होर्डीग, नो बॅनर, रुग्णमित्र उमेदवाराचा एकाकी प्रचार

वसई मतदार संघात बहुजन विकास आघाडी, महाविकास आघाडी आणि महायुतीत कडवी लढत होत असताना, रुग्णमित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमेदवाराने स्वतःचा एकट्याने केलेला प्रचार मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे.
परिवर्तनाची लढाई म्हणत यंदा वसई मतदार संघात जोरदार प्रचार होत आहे. वाहनांवर ध्वनीक्षेपक लावून, चौकसभा, होर्डीग, बॅनर, कर्णोपकर्णी उमेदवारांचा प्रचार सुरु आहे. त्यासाठी कार्यकर्ते, पेड-वर्कर दिवस-रात्र झटत आहेत. या सर्वांचा खर्च कार्यकर्त्याना चहा-पाणी, न्याहरी-भोजन असा त्यातून वारेमाप खर्च केला जात असताना, एक उमेदवार मात्र स्वतःचा प्रचार स्वतःच करीत आहे.
आरोग्य सेवेत उत्तम कार्य करीत असल्यामुळे हा उमेदवार खूप अगोदरच घरोघरी पोहोचला आहे. रुग्णमित्र म्हणून सुपरिचीत असलेल्या या उमेदवाराचे नाव आहे राजेंद्र ढगे.आरोग्याच्या शासकिय स्तरावरील योजनांचा गोरगरीबांना लाभ मिळवून देणे, रात्री-बेरात्री गरजु रुग्णांना उपचाराची मदत मिळवून देणे, बिलाचा रक्कम कमी करण्यास विनंती करणे, रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी रक्तदान शिबीरे आयोजित करणे अशी शेकडो कामे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी निःस्वार्थपणे केली आहेत. त्यातून जनमत आजमावण्यासाठी त्यांनी वसईची उमेदवारी केली आहे. त्यासाठी खांद्याला मेगाफोन आणि गळ्यात फलक लटकावून ते आपली रिक्षा ही निशाणी आणि उमेदवारी करण्याचे कारण मतदारांना सांगत आहेत.
लोकवर्गणी गोळा करुन राजेंद्र ढगे एकट्यानेच रेल्वे स्टेशन, बाजार, चौक, एसटी डेपो , घरोघरी दारोदारी अशा ठिकाणी आपला प्रचार करीत आहेत. महिला सुरक्षा, झोपडपट्टी पुनर्वसन, शेतकरी-मच्छिमारांसाठी योजना, सार्वजिनक स्वच्छता, मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पीटल, भटक्या कुत्र्यांना वैद्यकिय सुविधा, भिकारी आणि तृतीय पंथीयांना रोजगार असे त्यांचे प्रचाराचे मुद्दे आहेत. उमेदवार न आवडल्यास नोटा चा पर्याय ठेवण्यात आला आहे. अशा लोकांसाठी रुग्णमित्र राजेंद्र ढगे एक पर्याय ठरु शकतात, त्यामुळे त्यांना किती जनमत मिळेल हे २३ तारखेला समजेल.