
प्रभारी आयुक्त रमेश मनाले यांनी नियोजन करण्याच्या उपायुक्त यांना दिल्या सूचना
६ जानेवारी २०२५ रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आहे. हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त
महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षामध्ये पत्रकार दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करावा व यावेळेस पत्रकारांना मार्गदर्शनासाठी ज्येष्ठ पत्रकारांना प्रमुख व्याख्याते बोलवावे अशी मागणी महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेद्वारे करण्यात आली आहे. या पत्राची दखल घेऊन प्रभारी आयुक्त रमेश मनाले यांनी तात्काळ ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे नियोजन करावे अशा सूचना आस्थापना विभागाचे उपायुक्त सदानंद पुरव यांना दिल्या आहेत. निवेदन देताना महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष विजय ग खेतले, कार्याध्यक्ष मच्छिंद्र ए चव्हाण, सह खजिनदार राजेंद्र शर्मा, रायन डायस, सेहनाज शेख, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
६ जानेवारी २०२५ रोजी राज्य शासनामार्फत पत्रकार दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. राज्यात दरवर्षी ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पालिकेच्या नव्याने झालेल्या वास्तूमध्ये पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आलेला आहे . या कक्षात यंदापासून पालिकेमार्फत ६ जानेवारी२०२५ रोजी पत्रकार दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करावा, त्याचबरोबर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडिया, यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ,समाजमाध्यम तथा पत्रकारितेशी संबंधित सर्व मान्यवरांना ,विद्यमान खासदार आमदार, माजी आमदार माजी महापौर, नगरसेवक, तथा विविध सामाजिक, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, संघटनांचे पदाधिकारी यांना देखील निमंत्रित करावे अशी मागणी महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेमार्फत प्रभारी आयुक्त रमेश मनाले यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आस्थापना विभागाचे उपायुक्त सदानंद पूरव यांनी लवकरच या संबंधी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून याबाबत योग्य ते नियोजन करणार आहेत. व पत्रकार दिन कशाप्रकारे साजरा करायचा कोणत्या मान्यवरांना निमंत्रित करायचे याबाबत आयुक्तांशी बोलून अंतिम निर्णय घेतला जाईल असे महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेच्या शिष्टमंडळाला त्यांनी सांगितले आहे.