
वसई (प्रतिनिधी) मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर ते अच्छाड या १२५ किमीच्या टप्प्यात केलेले काँक्रिटीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे या महामार्गावर आत्ताच खड्डे पडले आहेत. पावसाळा सुरू झाल्यावर खड्ड्यांचे स्वरूप मोठ्या खड्ड्यात होऊन महामार्गावरून प्रवास करणाऱ्यां वाहनचालकांना त्रासदायक होणार आहे. सदर कामासाठी रू.६०० कोटी एवढा खर्च होऊनही निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याची दुर्दशा झाली असून ३० हून अधिक लोकांचा नाहक बळी गेला आहे. तसेच सदर महत्त्वाच्या मार्गावरील पुलाचे कथडे कमी उंचीचे असून एखाद्या वेळेस अपघात झाल्यास वाहन खाली कोसळून प्रवाशांची जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. त्याकरिता सर्वप्रथम हे कथडे उंच करणे गरजेचे आहे. रात्रीच्या वेळेत प्रवास करताना या महामार्गावरील पथदिवे बंद असल्याने वाहन चालकांना पुढील रस्त्याचा अंदाज येत नाही . त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. सद्यस्थितीत या महामार्गावरील पथदिवे बंद असल्याचे निदर्शनास आल्यामुळे वसई विरार शहर युवक काँग्रेसचे मा. अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक सुमित कुमार यांना दि.१६/०४/२०२५ रोजी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली आहे.
सदर राष्ट्रीय महामार्गावरून सर्वसामान्य प्रवासी , महत्त्वाच्या व्यक्ती प्रवास करीत असतात तरी त्यांच्या जीवाशी न घेता वरील महामार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करून पुलाचे कथडे उंच करावेत आणि पथदिवे त्वरित कार्यान्वित करण्याचे ठेकेदारास आदेश देऊन त्यानुसार लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे महामार्गावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.