वसई (प्रतिनिधी) :- वसई तालुक्यातील पोमण ग्रामपंचायत हद्दीतील सारजामोरी गाव परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या डांबर मिक्सिंग प्लांट व क्रशर प्लांटमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे या उद्योगांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पोमण ग्रामपंचायत हद्दीतील सारजामोरी भागात काही व्यक्तींकडून परवानगीविना डांबर आणि क्रशर प्लांट सुरू करण्यात आले आहेत. यामुळे दिवसेंदिवस धूळ, धूर, रसायने आणि उष्णतेमुळे परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना श्वसनाच्या तक्रारी, त्वचेच्या अ‍ॅलर्जी आणि पाण्यातील घाणीमुळे आरोग्याला धोक्याचा सामना करावा लागत आहे.

या प्लांट्सवर त्वरित बंदी न घातल्यास स्थानिक नागरिक तीव्र आंदोलन छेडणार आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन प्लांट्सची तपासणी करावी आणि जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

कोट

१) यामध्ये पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व पोमण ग्रामपंचायतीचे अधिकारी यांचा समावेश आहे. लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर आंदोलन करण्यात येईल. – धनंजय मोहिते

२) या अनधिकृत डांबर व क्रशर प्लांटला परवानगी देण्यात आली नाही. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने कारवाई करून गुन्हे दाखल करण्यासाठी आदेश दिले तर गुन्हे दाखल करण्यात येईल. – अविनाश कोष्टी, (तहसीलदार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *