
वसई (प्रतिनिधी):- ‘तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे आणि तू खालच्या जातीची आहेस’ असे सांगून लग्नाला नकार दिल्याने २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वसई पोलिसांनी मुलीचा प्रियकर आणि त्याच्या वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तरूणी रेवती निळे (२०) ही वसईत राहत असून महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. तिचे आयुष राणा (२१) या तरूणासोबत मागील ४ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आयुष तिच्याच वर्गात शिकत होता. तो वसईच्या भास्कर आळीतील नादब्रम्ह सोसायटीत रहातो. या काळात लग्नाचे आमिष दाखवून आयुषने वारंवार तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. मात्र नंतर लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर तो तिला टाळू लागला. त्याने रेवतीचा नंबरही ब्लॉक करून टाकला होता. त्यामुळे ती नैराश्यात होती. याबाबत तिने राणाच्या पालकांशी संपर्क केला. त्यावेळी त्यांनी हात वर केले. तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे तसेच तू खालच्या जातीची असल्याने माझ्या मुलाचे लग्न तुझ्याशी लावून देऊ शकत नाही असे आयुषच्या वडिल अजय राणा (५१) यांनी सांगितले. त्यामुळे २७ एप्रिल २०२५ रोजी तिने राहत्या घरात उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. याप्रकरणी वसई पोलिसांनी अजय राणा आणि आयुष राणा या पिता पुत्रांना रेवती निळे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
जादू टोण्याचा आरोप
आरोपी आयुष राणाचे वडील अजय राणा (५१) हे तांत्रिक आहे. ते रेवतीवर विविध धार्मिक विधी करत होते. तिच्या हाताला बांधण्यासाठी गंडा दिला होता. अनेकदा तिच्या बॅगेत ठेवण्यासाठी राख देत असे. असे केल्याने तुझ्यातील दोष दूर होईल आणि तुझे लग्न लावून देता येईल असे राणा सांगत होता, असा जबाब मयत रेवतीचा भाऊ दिनेश काळे याने वसई पोलिसांना दिला आहे. राणा कुटुंबिय जादूटोणा करणारे असून त्यांच्याविरोधात अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.