783d1b8c-1a9c-4cd9-9ee3-356d77ddd02d



मे. चंदना कन्स्ट्रक्शनचे लायसन्स रद्द करून गुन्हा दाखल करण्याची प्रा. डी. एन. खरे यांची मागणी

विरार, दि. १२ ऑगस्ट २०२५ – वसई-विरार शहर महानगरपालिकेत भ्रष्टाचाराच्या जाळ्यात गुंतलेल्या आणखी एका घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. चंदनसार प्रभाग समिती- “क” हद्दीत मौजे-कोपरी येथे सामाजिक सभागृह बांधण्याच्या कामात एकाच प्रकल्पासाठी दोन वेगवेगळे कार्यादेश काढून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टमार्गाने गंडा घालण्यात आल्याचे धक्कादायक तथ्य समोर आले आहे.

प्रा. डी. एन. खरे यांनी दिलेल्या तपशिलवार पुराव्यानुसार, आमदार निधी अंतर्गत हेच सभागृह प्रथम मे. गोपाळे नितीन भिमाशंकर यांना २०११ साली बांधकामासाठी देण्यात आले व ते काम २०१४ ला पूर्ण झाले. परंतु, आश्चर्य म्हणजे तेच पूर्ण झालेले काम २०१४ मध्ये पुन्हा मे. चंदना कन्स्ट्रक्शनला देऊन देयके वसूल करण्याचा भ्रष्टाचाराचा कळस गाठण्यात आला.

तपासात असे समोर आले की –

  • कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी खरा आणि खोटा असे दोन कार्यादेश काढले.
  • ठेका अभियंता यतीन राऊत यांनी दोन्ही कामांची मोजणी करून देयकांच्या नोंदी तयार केल्या.
  • मुख्य लेखा अधिकारी, मुख्य लेखापरीक्षक व तत्कालीन आयुक्त यांच्या स्वाक्षरीने खोट्या देयकांना मान्यता देण्यात आली.
  • मे. गोपाळे नितीन भिमाशंकर यांना आधीच रु. २१.७८ लाख अदा केल्यानंतरही पुन्हा त्याच कामासाठी ४२.९५ लाख रुपये धनादेशाद्वारे देण्यात आल्याचे दस्तऐवज उपलब्ध झाले.
  • मे. चंदना कन्स्ट्रक्शनला देखील रु. १९.४० लाखाचे देयक अदा करण्यात आले.

प्रा. खरे यांनी आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार दाखल करत, दोषी अधिकारी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करून लायसन्स रद्द करण्याची, देयकांची तातडीने वसुली करण्याची व भविष्यात अशा भ्रष्ट ठेकेदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.

तसेच, तत्कालीन कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांचे पेन्शन तत्काळ थांबवून नियमोचित कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. आयुक्तांनी याप्रकरणी आठ दिवसांत स्वतः जागेवर जाऊन तपास करून कठोर कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.

वसई-विरारकरांमध्ये या घोटाळ्यामुळे संतापाची लाट उसळली असून, “काम न करता देयक” हा भ्रष्टाचाराचा नमुना महापालिकेच्या इतिहासातील सर्वात कलंकित प्रकरणांपैकी एक ठरत असल्याची चर्चा जोरात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *