
प्रतिनिधी
विरार : या वर्षी झालेल्या मुसळधार वृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक भाग पुरात वेढले गेले. या पुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. हे संसार उभे करण्यासाठी; त्यांना मदतीचा हात देण्यासाठी विरार पूर्व-मनवेल पाड़ा येथील बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळाने पुढाकार घेतला असून; पक्षाने केलेल्या मदतीच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
मदतरूपी आवाहनातून उभी राहिलेली एक लाख रुपयांची रक्कम लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि युवानेते क्षितिज ठाकूर यांच्याकड़े रविवारी सुपूर्द करण्यात आली.
लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या आवाहनानुसार दरवर्षी श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ आयोजित युवा आमदार दहीहंडी उत्सवात महापौर सहायता निधीत ही रक्कम जमा करण्यात येते.
या वर्षी कोल्हापूर, सांगली, कोकणसह अन्य भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त नागरिकांना तातडीची मदत म्हणून एक लाख रुपये बहुजन विकास आघाडी अध्यक्ष व लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर व युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्याकड़े सुपूर्द करण्यात आली.
या वेळी बहुजन विकास आघाडीचे संघटक-सचिव व नगरसेवक अजीव पाटील, नगरसेवक पंकज ठाकूर, नगरसेवक प्रशांत राऊत, नगरसेविका संगीता भेरे, मीनल पाटील, चिरायू चौधरी, हेमांगी पाटील तसेच श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.
बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळाने या आधी माळीण गांव, केरळ, सकाळ पेपर निधी व गेली तीन वर्षे महापौर सहायता निधीस मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
