वसई : समाजहिताच्या कार्यात सातत्याने पुढाकार घेणारे आणि लोकसंपर्कात अग्रस्थानी असलेले समाजसेवक हरीश कोटकर यांची रोहित पवार फाउंडेशनच्या पालघर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ऋषिकेश नागेश करभजन यांनी हरीश कोटकर यांच्या वसई-विरार आणि पालघर परिसरातील दीर्घकाळ चाललेल्या सक्रिय सामाजिक कामाची दखल घेत ही जबाबदारी सोपवली आहे.

हरीश कोटकर हे सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून, ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील विकासकामे, नागरिकांच्या अडचणी आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. समाजातील वंचित घटक, तरुणाई, महिला आणि कामगार वर्गाशी थेट संवाद साधणारा, लोकांची नाळ ओळखणारा आणि त्यांच्या समस्या प्रत्यक्ष स्तरावर सोडविणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.

त्यांच्या नियुक्तीनंतर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

या नियुक्तीमुळे रोहित पवार फाउंडेशनचे सामाजिक उपक्रम पालघर जिल्ह्यात अधिक प्रभावी आणि जनहिताभिमुख पद्धतीने राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. हरीश कोटकर यांनी या निमित्ताने सांगितले की,

“समाजहिताचे कार्यच माझे खरे राजकारण आहे. रोहित पवार फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना समाजसेवेच्या प्रवाहात आणणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट असेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *