
फुटबॉलमध्ये सुवर्ण, हॉकीत कांस्य पदक
नालासोपारा : ५० व्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा–२०२५ मध्ये मिरा–भाईंदर–वसई–विरार पोलीस आयुक्तालयाच्या संघाने दणदणीत कामगिरी करत राज्यभरात आपला ठसा उमटवला आहे. सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारांत मिळवलेल्या यशामुळे आयुक्तालयाच्या क्रीडा परंपरेला नवी उंची प्राप्त झाली आहे.
कुस्ती, जुडो, बॉक्सिंग, वुशू, पॉवरलिफ्टिंग, जलतरण, टायक्वांडो व चेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारांत पुरुष गटातील पोलीस खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडवले. कुस्ती, जुडो, बॉक्सिंग, वुशू, पॉवरलिफ्टिंग आणि जलतरण या प्रकारांत संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर टायक्वांडो व चेटलिफ्टिंगमध्ये द्वितीय क्रमांक मिळवण्यात यश आले.
सांघिक पुरुष चषक स्पर्धेतही मिरा–भाईंदर पोलीस संघाची सरशी ठरली. कुस्ती, हँडबॉल व फुटबॉलमध्ये संघाने प्रथम क्रमांक मिळवला, तर व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, खो-खो, हॉकी व अॅथलेटिक्समध्ये द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून दमदार कामगिरी नोंदवली.
विशेष म्हणजे, API किशोर धायगुडे व PSI कुणाल कुरेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फुटबॉल संघाने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण कामगिरी केली, तर हॉकी संघाने तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदकावर नाव कोरले. संघभावना, शिस्त आणि काटेकोर सरावाचे हे फलित असल्याचे क्रीडा प्रशिक्षकांनी सांगितले.
महिला गटातही मिरा–भाईंदर पोलीस महिला खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. खो-खो, बॉक्सिंग आणि वुशू या प्रकारांत प्रथम क्रमांक, तर व्हॉलीबॉल, कुस्ती आणि अॅथलेटिक्समध्ये द्वितीय क्रमांक मिळवण्यात महिला संघ यशस्वी ठरला.
या एकूण कामगिरीच्या जोरावर मिरा–भाईंदर–वसई–विरार पोलीस आयुक्तालयाने जनरल चॅम्पियनशिप (पुरुष) मध्ये सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले, तर महिला गटात उपविजेतेपद मिळवले आहे.
या यशाबद्दल पोलीस आयुक्त मा. निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त मा. दत्तात्रय शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करत, पोलीस दलातील शिस्त, मेहनत आणि संघभावनेचे हे यशस्वी उदाहरण असल्याचे नमूद केले.
