सुख-दुःखात धावणारा कार्यकर्ता निवडणूक रिंगणात; प्रभाग ९ मध्ये धडकी वाढली

इतर उमेदवार सतर्क; प्रभाग ९ मध्ये श्यांकी ठाकूर यांची उमेदवारी केंद्रस्थानी

वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधून प्रितोष सिंह ठाकूर(श्यांकी) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नालासोपारा पूर्वेतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. समाजसेवक म्हणून परिचित असलेल्या प्रितोष ठाकूर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरताच प्रभागातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नालासोपारा पूर्व परिसरात सिद्धार्थ मित्र मंडळाच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक कार्य करणारा चेहरा म्हणून प्रितोष ठाकूर (श्यांकी) ओळखले जातात. परिसरातील नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणारा कार्यकर्ता, अशी त्यांची प्रतिमा आहे. विशेषतः कोरोनाच्या कठीण काळात गरजू नागरिकांना मदतीचा हात देत त्यांनी केलेले अथक परिश्रम आजही नागरिकांच्या स्मरणात आहेत.

याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, तरुणांसाठी क्रिकेट स्पर्धा, तसेच सामाजिक सलोखा जपण्यावर त्यांचा भर राहिला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, विविध पक्षांतील कार्यकर्त्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असून त्यामुळे त्यांना सर्वसामान्य जनतेसोबतच विविध स्तरांतून पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, प्रितोष ठाकूर (श्यांकी) यांच्या उमेदवारीमुळे इतर उमेदवारांची धाकधूक वाढली असून मतांचे विभाजन न होता एकत्रित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः तरुण, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक वातावरण दिसून येत आहे.

आता सर्वांचे लक्ष असणार आहे की पुढील टप्प्यात प्रितोष (श्यांकी) ठाकूर कोणती रणनीती आखतात, जनसंपर्काचा वेग कसा वाढवतात आणि मतदारांपर्यंत कोणत्या मुद्द्यांवर पोहोचतात. त्यांच्या उमेदवारीचा फायदा नेमका कोणाला होणार आणि कोणाला फटका बसणार, हे चित्र प्रचाराच्या पुढील टप्प्यात अधिक स्पष्ट होणार आहे.

एकंदरीतच, प्रभाग ९ मधील ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून समाजसेवक प्रितोष सिंह ठाकूर (श्यांकी) यांची सकारात्मक प्रतिमा या निवडणुकीत निर्णायक ठरते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *