घनश्याम आंबोकर , मिरा भाईंदर

मिरा-भाईंदर शहरात मागील काही काळापासून महिलांवरील अत्याचार आणि गुन्हेगारीच्या घटनांनी परिसीमा गाठली आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असतानाच, आता एका अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) एका महिला लोकप्रतिनिधीचे नाव समोर आल्याने शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पेणकरपाडा येथील पीडित अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मिरा-भाईंदर शिवसेना महिला आघाडीने थेट मुंबईतील महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मुख्यालयात धडक दिली.

शिवसेना महिला जिल्हा संघटक निशा नार्वेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महिला आयोगाच्या सदस्य सचिवांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना एक रोखठोक निवेदन सादर केले. या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दडपण आणले जात असल्याचा आरोप करत शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

‘महिला व बाल कल्याण’ सभापतींच्याच भावावर ‘पोक्सो’!

काशिमिरा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, आरोपी राजेश चव्हाण याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ‘पोक्सो’ (POCSO) आणि ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, मुख्य आरोपी राजेश चव्हाण हा मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या विद्यमान अध्यक्षा तथा भाजपा नगरसेविका अनिता पाटील यांचा सख्खा लहान भाऊ आहे. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या समितीच्या मुख्य पदाधिकाऱ्याच्याच कुटुंबातून असा प्रकार समोर आल्याने शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

गुन्ह्यात ‘सह-आरोपी’ करण्याची शिवसेनेची मागणी

शिवसेना महिला आघाडीने महिला आयोगाकडे सादर केलेल्या निवेदनात अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पीडित अल्पवयीन मुलीने आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती वारंवार भाजपा नगरसेविका अनिता पाटील यांना दिली होती. मात्र, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदावर असतानाही त्यांनी पीडितेला मदत करण्याऐवजी आपल्या भावांना पाठीशी घातल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

“हे संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी आणि आरोपीला वाचवण्यासाठी काशिमिरा पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांवर राजकीय दडपण आणले जात आहे. हा एक प्रकारे संघटित गुन्हेगारीचाच भाग असून, अनिता पाटील यांना या गुन्ह्यात ‘सह-आरोपी’ करून त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी.” – शिवसेना महिला आघाडी (निवेदनातून)

…तर ‘शिवसेना स्टाईल’ने तीव्र आंदोलन: निशा नार्वेकर

या संपूर्ण प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करताना शिवसेना महिला जिल्हा संघटक निशा नार्वेकर म्हणाल्या की, “मिरा-भाईंदर ही सुसंस्कृत भूमी आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे शहरातील महिला व भगिनी आज भयभीत आणि असुरक्षित आहेत. जर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीच नराधम आरोपींना पाठीशी घालत असतील, तर सामान्य महिलांनी न्याय मागायचा कोणाकडे? राज्य महिला आयोगाने या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घालून पोलिसांना कडक निर्देश द्यावेत. जर आरोपी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही, तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

‘या’ पदाधिकाऱ्यांची होती उपस्थिती

वांद्रे येथील महिला आयोगाच्या कार्यालयात निवेदन देताना मिरा-भाईंदर शिवसेना महिला जिल्हा संघटक सौ. निशा नार्वेकर यांच्यासह भाईंदर पूर्व महिला शहर संघटक पूजा आमगावकर, महिला जिल्हा समन्वयक डॉ. प्रिती पाटील, मिरा रोड महिला शहर संघटक डॉ. नयना वसानी आणि भाईंदर पश्चिम महिला शहर संघटक सरिता शिंदे प्रामुख्याने उपस्थित होत्या. याप्रकरणी आता राज्य महिला आयोग काय पावले उचलते आणि पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत न्याय मिळवून देण्यासाठी राज्य महिला समिती आ_df0f612b

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed