इसापच्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचल्या असतील. त्यात वाघ सिंह, ससा, हत्ती, लांडगा असे सगळे प्राणी असतात. अपवाद फक्त एक प्राण्याचा, तो प्राणी म्हणजे तरस ! पुराणणकाळापासून तरस त्याच्या निचपणाबद्दल इतके कुप्रसिद्ध आहे की कोणत्याही कथेत तरसाचा उल्लेख नसतो.

आज आम्ही तुम्हाला एका तरसाच्या टोळीची कथा सांगणार आहोत पण ही टोळी मानवी तरसांची आहे. ही आहे कुप्रसिद्ध अंजनाबाई गावित केस! 1990 ते 1996 इतकी वर्षे अंजनाबाई आणि तिच्या तीन मुलींनी क्रूर हत्याकांडाचं सत्र चालवलं होतं. ही केस एवढी अमानवी होती की न्यायालयालाही स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला फाशीची शिक्षा द्यावीशी वाटली.

या गोष्टीची सुरुवात होते कोल्हापूरपासून. अंजनाबाईचा पहिला नवरा एक ट्रक ड्राईव्हर होता. तिची पहिली मुलगी रेणुका जन्मली तेव्हा त्याने तिला सोडलं. ती रस्त्यावर आली. अश्या वेळी कुणी कष्ट करून पोट भरेल किंवा ते ही नाही जमले तर भीक मागून जगेल. पण अंजनाला हा मार्ग पटला नाही. तिने चोरीमारीचा मार्ग निवडला. तिने स्वतः सोबत आपल्या दोन मुलींनाही फरपटत नेलं. यातून पुढे जे घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत हादरून गेला.

अंजनाबाईने दुसरं लग्न केलं ते मोहन गावित नावाच्या एका निवृत्त सैनिका सोबत. दुसऱ्या मुलीच्या म्हणजे सीमाच्या जन्मानंतर त्याने पण तिला सोडलं आणि नवीन लग्न केलं. मोहन गावित आणि तिच्या नवीन पत्नी प्रतिमाच्या पोटी एक मुलगी जन्माला आली. तिचं नाव क्रांती. तिच्याबद्दल सांगण्याचं कारण म्हणजे १९९० साली अंजनाबाईने आपल्या मुलींना सांगून क्रांतीचा खून केला. हा त्यांच्या आयुष्यातील पहिला खून होता.

त्याच दरम्यान रेणुका एका मंदिरात पाकीटमारी करायला गेली होती. चोरी पकडली गेल्यावर लोक रेणुका गावितला मारायला धावले. त्यावेळी तिचा लहान मुलगा आशिष तिच्या सोबत होता. आपण पकडले गेलो आहोत हे समजताच तिने आपल्या मुलाला पुढं केलं आणि गर्दीलाच सवाल केला “तान्हुल्या मुलाला घेऊन कोणी कसं चोरी करेल”. लोकांनी त्या लहान मुलाला बघून दया दाखवली आणि रेणुकाला सोडून दिलं.

या घटनेने तिघींच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की, चोरी करूनही सापडले गेलो तर लहान मुले आपल्याला वाचवू शकतात. छोट्या अजाण बालकांना बालकांना मिळणाऱ्या सहानुभूतीचा आपण फायदा उचलू शकतो. तेव्हापासून तिघींनी चोरी करताना आपल्या सोबत लहान मुलांना ठेवायला सुरुवात केली.

रेणुकाचा नवरा किरण शिंदे हा ही या चोरीत पूर्ण सहभागी होता. तो पुण्यातील गाड्या चोरायचा. पुढे याच गाडीत बसून तिघींनी ठाणे, कल्याण, मुंबई, नाशिक भाग पिंजून मुलांना पळवून आणायला सुरुवात केली. 1990 ते 1996 या काळात गावित मायलेकीनी मिळून 43 पेक्षा जास्त लहान मुलांचं अपहरण करून खून केला. यातले अवघ्या १३ अपहारणांचा छडा लागला.

त्यांनी पाहिलं मुल कोल्हापूरच्या रस्त्यावर राहणाऱ्या बाईकडून पळवलं होतं. ती बाई भिक मागून आपलं आणि मुलाचं पोट भरायची. तिघींनी तिच्या नकळत मुलाचं अपहरण केलं.

एका मंदिरात सीमाने पाकीटमारीचा प्रयत्न केला आणि ती पकडली गेली. ज्याचं पाकीट होतं त्याने तिला रंगेहात पकडलं होतं. त्यांच्या भोवती गर्दी जमा झाली. त्या व्यक्तीने सिमाला चोपायला सुरुवात केली होती. यावेळी रेणुका जवळ संतोष होता. तिने लगेचच संतोषला अमानुषपणे जमिनीवर फेकलं. या तडाख्याने लहानग्या संतोषच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. या सगळ्यात गर्दीचं लक्ष वेधलं गेलं आणि दोघी निसटल्या.

संतोषला तशाच रक्तबंबाळ अवस्थेत घेऊन दोघींनी बस स्थानकातून ३ पाकीट मारले. यावेळी संतोष सतत रडत होता. अंजनाने ओळखलं की या मुलाचा आता काहीच उपयोग नाही. तिने त्याला एका लोखंडी खांबाला आपटून त्याचा जीव घेतला. नंतर त्याच्या मृतदेहाला त्यांनी एका रिक्षा स्टँड जवळ आणून कचऱ्यात फेकलं आणि काही झालंच नाही अशा अविर्भावात घरी परतल्या.

१९९१ साली त्यांनी नरेश नावाच्या ९ महिन्याच्या मुलाचं अपहरण केलं. नरेश खूप रडायचा म्हणून कंटाळून त्यांनी त्याला एवढं मारलं की त्याचा जीव गेला. आणखी एका भावना नावाच्या मुलीचं त्यांनी अपहरण केलं होतं. या मुलीच्या तोंडात त्यांनी बोळा कोंबला, तिला एका बॅगेत भरलं आणि नंतर तिला एका सिनेमागृहाच्या शौचायालात नेऊन पाण्यात बुचकळून मारलं.

ही सगळी मुलं १ ते १३ वर्षाखालील होती. बस स्टँड, रेल्वे स्टेशन, गर्दीचे ठिकाण, समारंभ अश्या जागा हेरून तिथून या मुलांना उचलण्यात आलं होतं. हा अपहरणाचा आकडा सरकारी आकड्यापेक्षा मोठा होता, कारण कित्येक तक्रारी नोंदवल्याच गेल्या नव्हत्या. या पळवून आणलेल्या लहान मुलांना भीक मागायला लावणे, त्यांना दुखापत करून सहानुभूती मिळवणे हे उद्योग अंजनाबाई आणि तिच्या मुली करत होत्या. वेळ येईल तेव्हा त्यांना वस्तू फेकावी तसं फेकुनही देत. कित्येक बालकांना यांनी भिंतीवर आपटून मारलं. कुणाचा गळा दाबला तर कुणाला अमानुषपणे उलटं टांगून मारलं. मुलं लहान असेपर्यंत त्यांचा उपयोग होई पण थोडी कळत्या वयाची झाल्यावर काय ? त्यांनी गुपित बाहेर कुणाला सांगितले तर? यावर एकच उपाय….मुलांना ठार मारणे!

त्यांच्यात एक नियम होता. कोणत्याही मुलाचा लळा लागता कामा नये. लळा लागला की ते मुल आधी मारून टाकायचं. एकदा दोघी बहिणींपैकी एकीला एका मुलाचा लळा लागला होता. त्या मुलाला खंडाळ्याच्या घाटात फेकून देण्यात आलं. मंडळ, आम्ही या तिघींना तरस का म्हणत आहोत याचं उत्तर इथे लपलेलं आहे. या तिघींना वेड लागलेलं नव्हतं, त्यांना कोणता आजार नव्हता. तिघींनी थंड डोक्याने, मारण्यासाठी म्हणून खून केले होते. या लोकांच्या लेखी मानवी आयुष्याला शून्य किंमत होती. अशा लोकांना फक्त तरासाचीच उपमा दिली जाऊ शकते.

१९९६ साली अंजनाबाईने आपल्या भूतपूर्व नवऱ्याच्या दुसऱ्या मुलीला मारण्याची योजना आखली. पण यावेळी त्याची पत्नी प्रतिमाने पोलिसांना बोलावून तिघींना बेड्या ठोकल्या. या तपासात असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितलंय की या तिघी निगरगट्ट होत्या. कोणीही तोंड उघडायला तयार नव्हतं. खास करून अंजनाबाई. ती फक्त बसून बघत राहायची. तिने कधीच काही सांगितलं नाही. शेवटी सीमाने हे मान्य केलं की त्यांनी क्रांतीचा खून केला होता. ‘आम्ही हे सगळं आईच्या सांगण्यावरून केलं’ असंही ती म्हणाली

पुढे आणखी शोध घेत असताना त्यांच्या घराची तपासणी करण्यात आली. तिथे त्यांना लहान मुलांचे कपडे सापडले. काही फोटोग्राफ्स पण सापडले. हे फोटोग्राफ्स रेणुकाच्या मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीचे होते. फोटोंमध्ये अनोळखी लहान मुलं पण दिसत होती. अशा पद्धतीने त्यांच्यावर संशय बळावला आणि पुढे त्यांच्यावर १३ मुलांच्या अपहरणाचा खटला उभा राहिला. यातील ९ मुलांचा त्यांनी खून केला होता हे सिद्ध झालं.

अखेरीस १९९६ रोजी हे हत्याकांड उघडकीस आले आणि अवघा महाराष्ट्रच काय तर संपूर्ण भारत देश हादरला. पोलिसांनी आधीच अंजनाबाई गावित, रेणुका गावित, सीमा गावित आणि किरण शिंदे यांना अटक केली होती.

खटल्यात तिघींच्या विरोधात ठोस पुरावे असूनही त्यांना फाशी होणं शक्य झालं नसतं. हे शक्य झालं कारण रेणुकाचा नवरा किरण शिंदे याने आपली कातडी वाचवण्यासाठी माफीचा साक्षीदार होण्यास कबुली दिली. या कारणानेच किरण शिंदेच्या सहभागाचा त्रयस्थ असा उल्लेख जबानीत करण्यात आला आहे. पण ही सरकारी बाजूची मजबुरी होती. किरण शिंदे केवळ एक त्रयस्थ नव्हता तर तोही या हत्याकांडात सामील होता.

२८ जून २००१ रोजी कोल्हापूर सेशन कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. यापेक्षा मोठी शिक्षा नव्हती म्हणून कोर्टाचाही नाईलाज झाला असावा. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच कुणा महिलेला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली गेली होती.

फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच १९९७ साली तुरुंगात असताना अंजनाबाईचा मृत्यू झाला. २०१४ साली फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप द्यावी यासाठी रेणुका व सीमा गावित भगिनींनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. पण तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तो फेटाळून लावला.

आता प्रश्न पडतो की या तिघी या पूर्वी कशा पकडल्या गेल्या नाहीत. याचं कारण फार भयावह आहे. एकट्या अंजनाबाईच्या नावावर १२५ पाकीटमारीचे केसेस होते. त्यांनी मुलांना पळवून नेण्यास सुरुवात केली तेव्हाही त्या अधूनमधून पोलिसांच्या हाती लागल्या होत्या. या सर्वांना पोलीस गुन्हेगार म्हणून ओळखत होते पण प्रत्येक वेळी पोलिसांनी पैसे खाऊन सोडल्याने ही टोळी अशा मार्गाने पैसे कमवत असेल हे उघडकीस आले नाही. या अमानवी कृत्यात पोलीसही तितकेच दोषी होते. एवढं होऊनही दोघी बहिणांना फाशी का होत नाहीय ? तर, त्याला उत्तर नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *