

सातार्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले भाजपाच्या वाटेवर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे पुन्हा पक्षांतर करणार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर? अशा प्रश्नार्थक परंतु शिवसेना-भाजपाच्या गोटात आनंद, उत्साह वाढवणार्या बातम्या सातत्याने झळकत आहेत. विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती, घरघर काही थांबण्याचे नाव घेत नाही. हे ठाणे किंवा मुंबईपुरतच नसून राज्यभर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जुन्या आणि जीर्ण झालेल्या जलवाहिन्या रातोरात फुटत आहेत. काँग्रेसच्या इगतपुरीच्या आमदार तथा नऊ वेळा खासदार राहिलेल्या माणिकराव गावित यांच्या कन्या निर्मला गावित आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार रश्मी बागल शिवसेनेच्या शिवबंधनात अडकल्या. माजी मंत्री आणि करमाळ्याचे दिवंगत आमदार दिगंबरराव बागल यांच्या त्या कन्या. याच रश्मी यांच लग्न शरद पवार यांनी लावून दिल्याचा इतिहास आहे.‘राष्ट्रवादीत कामाची कदर नाही’, असा थेट आरोप करत रश्मी यांनी लागलीच पक्षांतर केले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा युवा चेहरा आणि शरद पवार यांचे अंत्यत विश्वासू सहकारी सचिन आहिर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता आणि येत्या काळातही शिवसेना-भाजपात कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या! याचीच झाकी दिसत आहे. मेगाभरती, महाभरती, जम्बो भरती अशा वर्तमानपत्रांच्या हेडलाईन सजत आहेत. सत्ता आणि पदाचा हव्यास हा जिवात जीव असेपर्यंत कधीच सुटत नाही, हेच या पक्षांतराचे गणित आहे. माझा पक्ष, माझी वैचारिक भूमिका याला बदलत्या राजकीय ट्रेंडमध्ये थारा नाही. सरशी तेथे पारशी या न्यायाने आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी हल्लीच भाजपात चिरंजीव आमदार वैभव पिचड यांच्यासह दाखल झालेले राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड. विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून शेरोशायरीतून सरकारला डागण्या देणारे राधाकृष्ण विखे-पाटील ऐन लोकसभा निवडणुकीत भाजपवासीय झाले. मुलगा सुजय विखे-पाटील यांना खासदार बनविण्यासाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय फक्त राजकारण आणि सत्तेला ओळखतो. उदयन भोसले यांच्याशी पटत नसल्याने शिवेंद्र भोसले यांनी राष्ट्रवादी सोडून धरलेली भाजपाची वाट. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि नवी मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता असलेले गणेश नाईक यांच कुटुंब रमलय भाजप प्रवेशात ही ओढ का बरं असावी? आपल्या मतदारसंघात आपला जनाधार घटतो आहे, हे ओळखण्यासाठी त्यांना 2019 पर्यंत वाट का पाहावी लागते? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असताना भाजपा आणि शिवसेनेतूनही मोठ्या प्रमाणावर आउटगोईंग होतेच. परंतु, वर्षांनुवर्षे आपलं संस्थान बनवणार्या या मंडळींचा जीव आताच सत्तेविना का रमत नाही, हेच खरं कोडं आहे. आजच्या नवयुगात प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं. तसं राजकारणात सर्व काही माफ असतं. कधी कोण कुणाचं होईल, याचं गणित बांधण्याच्या भानगडीत पडायचं नसंत. तूर्त गोविंदा गोपाळा.. अशा उत्सवी माहोलात भाजपा आणि शिवसेनेच्या उघड्या दरवाजातून आणखी किती काँग्रेस, राष्ट्रवादीवाले युतीयुक्त होणार आहेत, हे पाहणेच औतुस्क्याचे ठरेल. राजकारणात काही डावं, उजवं घडलंच तर त्यामागे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा हात असेल, असे आडाखे वर्षानुवर्षांचे आहेत. आजही कूस बदलणार्या राजकारणामागे‘पवारतंत्र’ का बरं नसावे, असा थट्टेने चर्चिला जाणारा विषय आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडाला खिंडार पडून 52 नगरसेवक भाजपात आधीच दाखल झाले आहेत. आता ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरातही शिवसेना-भाजपात कोण कोण येणार? याची यादी सोशल मिडियावर कळते-समजते फिरत आहे. पुन्हा युतीतच सरकार येणार! किंबहुना शिवसेना-भाजपात दाखल झालेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक ही किमया करून दाखवणार, हा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना असल्याने अर्धी लढाई जिंकल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीतून दररोज एकएक करून उडणार्या नेत्यांचे पक्ष प्रवेशसोहळे पाहणे, हीच विधानसभा निवडणुकीची खरी रंगत आहे.