
खानिवडे,वार्ताहर:
चालू वर्षी थैमान घातलेल्या पावसामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात पुराचे संकट ओढवून त्यामध्ये कैक संसार उद्धस्त झाले आहेत . यामध्ये सांगली,कोल्हापूर येथील भयानक परिस्थिती दुर् दर्शन द्वारे पाहिल्याने प्रत्येकाचे मन हेलावून गेले .याला खानिवडयाच्या महिला अपवाद कश्या राहतील . पाहिलेल्या या परिस्थितीमुळं खानिवडयाच्या महिलांनी एकत्र येऊन आपल्याकडून काय मदत होईल याचा विचार केला . यातून दरसाल आपण साजरी करत असल्या मंगळागौरीचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करून त्यासाठी होणार खर्च हा पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला . याप्रमाणे साऱ्या गावातील महिला श्रीराम मंदिरात पारंपरिक वेषात एकत्र आल्या व त्यांनी मंगळागौरीची साधेपणाने पूजा करून पाच हजार एक रुपयांची मदत पूरग्रस्तांना दिली . यातून खानिवडयाच्या भगिनींनी समाजाप्रती असलेली आपली मातृ भगिनींची भावना दाखवत एक आदर्श निर्माण केला आहे . त्यांच्या या विचारामुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे .
या बाबत बोलताना अनेक भगिनींनी सांगितले कि, वसई तालुक्याला पर्यायाने तानसा खाडीच्या किनाऱ्याला असलेल्या अनेक गावांसह खानिवडे गावाला पूर काय आहे हे चांगलेच ठाऊक असून दरसाल थोड्या अधिक प्रमाणात पुराचा सामना करावा लागतो . यात अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने मांडलेल्या संसाराचा बट्ट्याबोळ होतो . हा अनुभव असल्याने पुराची दाहकता किंवा झळ काय आहे हे आम्हाला ठाऊक असल्याने आमच्याकडून खारीचावाटा म्हणून मदत करावीशी वाटली
