

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली,कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पावसाने घातलेल्या थैमानाने सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. सद्या स्थितीत पावसाने उसंत घेतली असून पूर ओसरला असला तरीही अनेक स्थानिकांचे संसार उध्वस्त होऊन तेथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. ह्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी आणि पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरात सर्वच स्तरातील लोकांकडून कसोशीने प्रयन्त सुरू आहेत. या प्रसंगाचे गांभीर्य राखत पूरग्रस्तांसाना ह्या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी पालघर तालुक्यातील सफाळे भागातील आम्ही सफाळेवासीय या व्हॉट्स अप ग्रुपच्या माध्यमातून गोळा केलेल्या 1 लाख 7 हजार रुपयांचा धनादेश शुक्रवार, दिनांक 30 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
अतिवृष्टीमुळे सांगली,कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेली जीवित आणि वित्तहानी भरून निघण्यास आपल्याकडून यथाशक्ती मदत व्हावी या हेतूने सफाळेतील आम्ही सफाळेवासीय या व्हॉट्स अप ग्रुपच्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आर्थिक स्वरूपात मदत देण्यासाठी ग्रुपचे एडमीन पत्रकार नवीन पाटील यांच्या मार्फत आव्हान करण्यात आले होते. या आव्हानाला ग्रुप मधील सर्वच सदस्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत सुमारे 1 लाख 7 हजार रुपयांचा निधी गोळा केला. या निधीचा धनादेश सफाळे परिसराचे मुखपत्र असणारे साप्ताहिक सफाळे वृतांतच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्याकडे शुक्रवारी देण्यात आला. यावेळी ग्रुपचे एडमीन नवीन पाटील यांच्यासह विभूती मेस्त्री, नरेश पाटील, हेमंत पाटील आणि सुप्रिया सावे उपस्थित होते.