झाड हटविण्यास ग्रामपंचायत सहकार्य करीत नसल्याने वीज कर्मचारी हतबल

 

सफाळे 

वादळी वारा विजेचा कडकडाटासह परतीच्या मुसळधार पावसाने संबंध पालघर जिल्ह्याला झोडपून काढल्याने सर्वत्र मोठे नुकसान होऊन असून ठिकठिकाणी मोठमोठी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र त्या त्या विभागातील सक्रिय ग्रामपंचायत प्रशासनाने वीज कर्मचाऱ्यांना वेळीच सहकार्य केल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली. तर दुसरीकडे कपासे ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे गावातील वाहतुकीच्या रस्त्याजवळील चालू वीज वाहिनीवर मोठे वृक्ष कोसळले. मात्र दुसरा दिवस उजडूनही ग्रामपंचायतीचा कोणताच पदाधिकारी घटनास्थळी भटकला नाही. सदर ठिकाणी कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून सफाळे वीज वितरण विभागाकडून तेथील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. दोन दिवस होऊनही बेजबाबदार ग्रामपंचायत प्रशासन वीज कर्मचाऱ्यांना झाड हटविण्यास सहकार्य करीत नसल्याने ग्रामस्थांना अंधारात राहावे लागत आहे.

सफाळे पश्चिमेकडील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत वादग्रस्त असणाऱ्या कपासे ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे फाटक ते उड्डाणपूल दरम्यानच्या वाहतुकीच्या रस्त्या शेजारील वीज वाहिनीवर गुरुवार 12 सप्टेंबर रोजीच्या रात्री मोठे वृक्ष कोसळले. यासंदर्भात स्थानिकांनी सफाळे वीज वितरण विभागाला माहिती दिली. त्यानुसार वीज कर्मचाऱ्यांनी तेथील वीजपुरवठा तात्काळ खंडित केला. गावातील विजवाहिनीवर भलेमोठे झाड कोसळूनही कपासे ग्रामपंचायतीचा कोणत्याच पदाधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने तेथे पाहणी करण्याची तसदी घेतली नाही. शनिवारी सकाळी वीज कर्मचारी आणि स्थानिकांनी गावाचे उपसरपंच नागेश तसेच कर्मचारी विकास भोईर यांना संपर्क साधला, मात्र सायंकाळपर्यंत कोणीच सहकार्य न केल्याने वीज कर्मचाऱ्यांना परतावे लागले. तर कपासे ग्रामपंचायतीच्या बेजबाबदारपणाच्या कारभारामुळे ग्रामस्थांना दुसऱ्या दिवशीही अंधारात रात्र काढावी लागणार असल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पश्चिमेकडील कपासे फाटक ते उड्डाणपूल दरम्यानच्या नेमक्या याच ठिकाणी विजवाहिनीवर मोठे झाड कोसळून तीन दिवस उलटूनही ग्रामपंचायतीने लक्ष दिले नव्हते. रेल्वे फाटक जरी बंद असले तरी रेल्वे लगतच्या या जुन्या रस्त्यावरून परिसरातील विविध गावापाड्यातील नागरिक याच रस्त्याचा आजही वापर करतात. गेल्या काही वर्षांपासून खड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. महिन्यातील कित्येक दिवस रस्त्यावरील दिवाबत्तीचा पत्ताच नसतो. रस्त्याच्या दुतर्फा 4 ते 5 फूट गवत वाढले असून पायी चालत जाणाऱ्यांना साप, विंचु आदी विषारी जीवजंतूंचा नेहमीच त्रास होतो. तर विविध कारणांमुळे नेहमीच वादात असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या बेपर्वाईमुळे ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे.


महावितरणच्या सफाळे विभागातील बहुतांश ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच इतर पदाधिकारी आपत्तीजनक परिस्थिती उदभवल्यास वीज कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहून गावातील समस्या सोडवितात. मात्र कपासे ग्रामपंचायत याला नेहमीच अपवाद ठरत असून प्रत्येकवेळी ग्रामपंचायतीच्या दृलक्षितपणामुळे गावातील विजेशी निगडित समस्या सोडविताना अनेक अडचणी येतात.
मुकुंद देशमुख, उपकार्यकरी अभियंता, सफाळे उपविभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *