

पत्रकारांना केले पाठबळ देण्याचे आवाहन…..…………
नवीन, सुंदर नालासोपारा घडवण्यासाठी खूप काही करावं लागणार आहे. इथल्या समस्या तुम्हाला माहिती आहेतच, मलाही दिसताहेत. अनेकांशी बोलतोय. एक एक्शन प्लॅन लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे. या सगळ्यात तुमच्या पाठबळाची नितांत गरज मला लागणार आहे, अशी भावना नालासोपारा विधानसभा लढवण्यासाठी सज्ज झालेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी सोमवारी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधताना व्यक्त केली.
पत्रकार हा समाजाचा जागल्या असतो. त्याची नजर सर्वत्र असते. याचसाठी मला तुमच्याकडून या भागातील समस्यांची, प्रश्नांची सविस्तर माहिती घ्यायची होती. इथल्या सत्ताधाऱ्यांनी गेल्या तीस वर्षांत जे केले नाही ते मला घडवून दाखवायचे आहे. 99 टक्के समाजकारण आणि 1 टक्का राजकारण याच हेतूने मी येथे आलोय, असे शर्मा यांनी सांगितले. येथील स्थानिक लोकप्रतिनिधीने गेल्या दहा वर्षांत पत्रकारांशी असा संवाद साधला नव्हता की आमच्याकडून काही जाणून घ्यायचा प्रयत्नही केला नव्हता, असे काही पत्रकारांनी शर्मा यांच्या या संवाद उपक्रमाबद्दल अभिनंदन करताना बोलून दाखवले. शर्मा यांच्या या संवादसेतूमुळे पत्रकारांना एरव्ही किरकोळ समजणाऱ्या बहुजन विकास आघाडीत मात्र अस्वस्थता पसरली आहे.
ठाणे, मुंबईतील तडीपार गुन्हेगार इथे येत असतात. त्यामुळेही गुन्हेगारी वाढते. गृहमंत्रालय, पोलीस खात्यातील वरिष्ठ यांच्याशी बोलून तडीपार गुन्हेगार पालघरला येतात हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे. कपिल शो या कार्यक्रमात कृष्णा अभिषेक सातत्याने नालासोपाराचे नाव कुचेष्टेने घेत असतो. ही बदनामी थांबवण्यासाठी सोनी टीव्ही वाहिनीला पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
इथल्या जनतेला हालअपेष्टांत ठेवणाऱ्या अनिष्ट घटकांचे, कारणांच निराकरण करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला येथे पाठवले आहे. माझी कंट्रोल रूम तेवढ्यासाठीच तर सुरू केली आहे. इथल्या प्रत्येक प्रश्नांवर तज्ज्ञांकडून मार्ग शोधण्याचे माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, अशी ग्वाही त्यांनी दिली. स्थानिकपणाचा मुद्दा उपस्थित झाल्यावर मी काही पाकिस्तानातून आलेलो नाही, असे शर्मा यांनी म्हणताच हास्याची खसखस पिकली. आपण महाराष्ट्राच्या कर्मभूमीत लहानपणापासूनच शिकलो, वाढलो आहोत. आता निवृत्तीनंतर इथेच वास्तव्याला आलो आहोत, असेही ते म्हणाले.
गुन्हे, पिण्याचे पाणी, अनधिकृत बांधकामे, पूरग्रस्त नालासोपारा, वैद्यकीय असुविधा, नायजेरियन गुंड, अमली पदार्थांची विक्री, पोलिसांची वर्तणूक अशा अनेक प्रश्नांची सविस्तर माहिती पत्रकारांनी त्यांना दिली. नियोजनबद्ध पुनर्विकास ही नालासोपाराची गरज असल्याचे मत शर्मा यांनी व्यक्त केले. दर्जेदार शैक्षणिक सुविधांसाठीही प्रयत्नशील असून आपण सर्वजण मिळून ठरवू, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. इथल्या जनतेला बदल हवा आहे, तुम्हालाही हवा आहे, त्यासाठी तुम्ही मला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.