

मुंबई:-महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकांमधील घोटाळ्याशी संबंधित आरोपांवर हा गुन्हा दाखल झाला आहे .
आरोपींमध्ये दिलीपराव देशमुख, ईशरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलवडे, आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे. सहकारी साखर कारखान्यांना कर्ज वितरणात अनियमितता असल्याचा आरोप आहे. कमकुवत आर्थिक स्थिती असूनही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आली होती. बऱ्याच प्रकरणांमध्ये कोणत्याही तारणविना कर्ज मंजूर केले गेलं होतं.
सहकारी साखर कारखाने आजारी पडल्यानंतर चुकीच्या पद्धतीने फायदा घेण्यासाठी अतिशय कमी किमतीत ते विकण्यात आली होती. सहकारी साखर कारखाने काही विशिष्ट राजकारण्यांच्या जवळच्या नातेवाईकांना विकण्यात आले होते. त्यावरून प्रचंड आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यावर हे गुन्हे दाखल झाल्याने राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.