

विरार नालासोपराचा चेहरामोहरा बदलण्याचा चंग बांधून येथील लढाईत उतरलेल्या प्रदीप शर्मा यांनी थेट लोकांशी संवाद साधून स्थानिक प्रश्नांना हात घातल्यामुळे बहुजन विकास आघाडीला टेन्शन आले आहे. लोकांशी संवाद, शिवसेना शाखांना भेट, जो प्रश्न घेऊन भेटायला येईल त्याच्याशी आश्वासक, प्रामाणिक भावनेतून चर्चा शर्मा करत असल्यामुळे बविआच्या नेतृत्त्वाच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. यामुळे शर्मा यांच्या पावलावर पाऊल टाकून बविआच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना घरोघरी पाठवायला सुरुवात केली आहे.
बविआचे कार्यकर्ते वेगवेगळ्या भागांत जाऊन आता लोकांशी बोलायला लागले आहेत. बविआवर नाराजी का ते जाणून घ्यायला लागले आहेत. प्रदीप शर्मांमुळे आलेली बदलाची लाट अशा प्रकारे बविआनेही स्वीकारली असल्यामुळे आणि लोकांशी संवाद होऊ लागल्यामुळे अनेक भागांतील लोक शर्मा यांना धन्यवाद देत आहेत.
गेले तीन दिवस पाण्याविना काढणाऱ्या भीमडोंगरी भागात शर्मा यांच्या पीएस फाऊंडेशनची टीम पोहचल्यावर लगेचच पाण्याची समस्या लोकांनी समोर मांडली. ते कळताच स्थानिक नगरसेविका शोभा मोरे यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. लोकांनी पाणी नसल्याबद्दल त्यांना जाब विचारल्यावर वरमलेल्या मोरे यांना पाणी सुरू करण्याची लगीनघाई केली. शर्मांमुळे तीन दिवसांनी नळाला पाणी आले अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली.
शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधल्यावर बविआनेही तातडीने कधी नव्हे ते पत्रकारांना चर्चेसाठी पाचारण केले होते. या पत्रकार परिषदेतच बविआ नेत्यांनी, आम्ही लोकांशी बोलतच असतो, कुणीही आमच्याकडे येऊ शकतो, अशी पाठ थोपटून घेतली होती. त्यानंतर आता बविआने पुन्हा शर्मा यांचे अऩुकरण करायला सुरुवात केली आहे.