केळवेः. दि.२९ सप्टेंबर २०१९. २६ जानेवारी १९७० रोजी स्थापन झालेल्या युवक मित्रमंडळाने त्याच वर्षापासून नवरात्रोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.मागची ४९ वर्ष ही परंपरा ३ वेगवेगळ्या पिढ्यांनी सुरु ठेवली असून ह्यावर्षी ह्या उत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. नवनविन चित्तवेधक आणि सामाजिक संदेश देणारे देखावे, स्थानिक कलाकारांनी सादर केलेली नाटके, एकांकीका व सांस्कृतिक कार्यक्रम ह्या उत्सवाचा अविभाज्य भाग असून किर्तने , पारायणे इ. कार्यक्रमही उत्सवामधे पार पाडले जातात.
चालू वर्ष मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने संपूर्ण उत्सवात नानाविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ह्याची सुरुवात आजच्या श्री दुर्गादेवीच्या आगमन मिरवणुकीने झाली. आदर्श विद्यामंदिर केळवे शाळेचे लेझिम पथक व सफाळे येथील शिवकल्लोळ ढोलताशा पथकाच्या साथीने श्री दुर्गादेवीचे जल्लोशात आगमन करण्यात आले. ढोलताशांचा गर्जनाद, त्याच्यासोबत साथीने नाचणारे भगवे झेंडे आणि सभासदांचा उत्साह यामुळे आजची मिरवणूक संस्मरणीय ठरली. आजच्या आगमन मिरवणूकीत सुद्धा सर्व धर्मियांचा सहभाग दिसून आला हे विशेष. आगमन मिरवणूकीत गावातील सर्व युवक युवतींनी पारंपारिक वेशात भाग घेतला. तसेच ढोल ताशा व लेझीम च्या गजरात नृत्य करत आगमन मिरवणूकीची शोभा वाढवली.
ह्या वर्षीच्या सांस्कृतिक कार्यक्रमां मधे पाटकर वर्दे महाविद्यालयातर्फे दोन एकांकीका सादर करण्यात येणार असून स्थानिक मंडळे कलाप्रेमी माहीम व क्रिएटिव्ह कलाकार वसई ही मंडळेही दोन एकांकीका सादर करणार आहेत. त्याच बरोबर गर्जतो मराठी नावाचा वाद्यवृंद संगीताचा कार्यक्रम सादर करणार असून रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा देखील आयोजित केल्या आहेत. सुश्राव्य किर्तन व स्थानिक कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच गरबा नृत्याचा आस्वादही भाविकांना ह्या सुवर्ण महोत्सवी उत्सवा दरम्यान घेता येणार आहे.
श्री सच्चिदानंद महाडीक ह्याच्या अध्यक्षतेखाली १९७० साली सुरु झालेल्या युवक मित्रमंडळाचे अध्यक्षपद सर्वश्री. विनोद पाटिल, सुधीर महाडिक, प्रविण पाटिल, मिलिंद पाटिल, प्रदिप बारी, मुझफ्फर शेख, प्रदिप कोरडे, चंद्रकांत साखरे, रमेश पाटिल इ. व इतर मान्यवरांनी भुषविले असून सध्या प्रविण पाटिल ह्यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी मंडळात हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन अशा सर्व धर्मीय कार्यकर्त्यांचा समावेश आहे. अशा सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या ह्या उत्सवासाठी युवक मित्रमंडळाने सर्व भाविकांना आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *