

ठाणे जिल्हयाच्या जडणघडणीत, शेतकऱ्यांच्या हितरक्षणार्थ अनमोल योगदान देणारे लोकनेते, समाजसुधारक अण्णासाहेब यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त गुरुवारी सकाळीच महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी विरार पूर्वेकडील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात जाऊन अण्णासाहेबांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
अण्णासाहेब वर्तक यांनी राजकारणाच्या क्षेत्रात वावरताना समाजातील शेवटच्या माणसाला समोर ठेवून विविध निर्णय घेतले आणि संस्थात्मक कार्याची उभारणी केली, अशा भावना या वेळी श्री. शर्मा यांनी महाविद्यालयाच्या विश्वस्तांकडे व्यक्त केल्या. यामुळेच आज या प्रेरणादायी नेत्याच्या जयंतीदिनीच सर्वसामान्यासाठींचा माझा जाहीरनामा प्रकाशित करत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
बाहेरचे म्हटले जाणारे तुम्ही अण्णासाहेबांच्या जयंतीदिनी अभिवादन करायला आलात पण, इथले स्थानिक सत्ताधारी बविआचे अर्धेअधिक पदाधिकारी, नेते, नगरसेवक याच शाळेत शिकले असूनही गेल्या 20-25 वर्षांत अण्णासाहेबांना अभिवादन करायला फिरकलेले नाहीत, अशी खंत यावेळी काहींनी बोलून दाखवली. यावर, शर्मा यांनी अण्णासाहेबांच्या उत्तुंग कार्यातील एखादा कण तरी अनुकरण करण्याचा प्रयत्न करीन, अशी विनम्र ग्वाही दिली.