

विरार – गेल्या वेळी पालघर आणि वसईत आलो होतो, तेव्हा खासदार घेऊन गेलो. आता यावेळी जिल्ह्यातून सहा आमदार घेऊन जायचे आहेत. पोलीस तर मी तुम्हाला दिलाय, आता धनुष्यबाणाला मतदान करून चोर कोण आहेत त्यांना तुम्हीच पळवून लावा, जनतेची दहशत वाटली पाहिजे असा कायमचा धडा शिकवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी मानवेलपाडा, विरार (पूर्व )येथील जाहीर सभेत केले.
शिवसेना भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे नालासोपारा आणि वसई येथील उमेदवार अनुक्रमे प्रदीप शर्मा आणि विजय पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत त्यांनी वसई, विरारमधील गुंडाराजवर सणसणीत कोरडे ओढले. ज्याच्या हातात भगवा त्याला कुणालाच घाबरण्याची गरज नाही. आता दहशत तुमचीच असायला हवी, असे सांगत त्यांनी, शर्मा यांना जाणीवपूर्वक नालासोपारात उमेदवारी दिली असल्याचे सांगितले. लोक म्हणजे गुलाम नाहीत. माझा शिवसैनिक मुंबई वाचवतो तो इथली गुंडागर्दी मोडून टाकेल, शिल्लक ठेवणार नाही, असे ते म्हणाले. शिवसेनेचा वचननामा म्हणजे थापा नाहीत, मी त्यातील प्रत्येक बाबीला जबाबदार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
इथल्या गोरगरिबांना जे नाडतात, पाणी, वीजेसाठी दहशत दाखवतात त्यांची दहशत मोडून नाही काढली तर प्रदीप शर्मा माझं नाव नाही, अशी गर्जना या वेळी प्रदीप शर्मा यांनी केली. दबावाला, आमिषाला बळी न पडता बदलाला साथ द्या, निर्भयपणे मतदान करा. शेजारच्या ठाणे, नवी मुंबई, मुंबईसारखं सुंदर नालासोपारा, विरार आपण घडवू हा माझा शब्द आहे, असे ते म्हणाले.
शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजेंद्र गावित, भाजपचे महासचिव राजन नाईक, मनोज पाटील, सायमन मार्टिन, मिलिंद वैद्य व इतरांची या वेळी भाषणे झाली. विविध संघटना आणि पक्षातील काही लोकांना ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश देण्यात आला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, लोकसभेला दिला तसा आणखी एक दणका देऊन यांची येथील दादागिरी आणि भ्रष्टाचाराने बरबटलेली सत्ता मुळासकट उखडून फेका.नळाला पाणी नाही आणि दारातून मात्र घरांत पाणी शिरते. नाले, रस्ते अरुंद, पाण्याच्या निचऱ्याची बोंब, आरोग्य आणि शिक्षणाची वाताहत हे सगळं किती दिवस सहन कारणार? यातून परिवर्तन घडविण्यासाठी आता महायुतीच्या येथील दोन्ही उमेदवारांना विधानसभेत पाठवा. ते तुमची सेवा करतील हे माझे वचन आहे.