

वसई : (प्रतिनिधी) : परप्रांतीयांच्या वाढत्या वस्त्या, बकाल झोपड्या, राहणीमानाचा खालावलेला दर्जा, आरोग्य, पाण्याच्या नावाने ढासळलेल्या सुविधा अशा नालासोपार्यात आता वारांगणांच्या वाढत्या उच्छादाचे विघ्न उभे ठाकले आहे. नालासोपार्यातील वाढत्या वेश्याव्यवसायाला आळा घालण्यासाठी नालासोपार्याचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी स्वत: पोलीसांना रितसर निवेदन देऊनही पोलिसांनी अद्याप कारवाईसाठी पुढाकार न घेतल्याने नागरिकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. वसईच्या सभ्य संस्कृतीला कालिमा फासण्याचे प्रकार परप्रांतीयांनी हाती घेतले आहेत. यात महाविद्यालयीन तरूण, नागरिक यांच्यावर विपरित परिणाम होण्याची भिती व्यक्त होत आहे. नालासोपार्यातील काही दक्ष तरूणांनी काल नालासोपारा पुर्व-पश्चिम जोडणार्या उड्डाणपुलावरील वारांगणांच्या मोकाट वावराचा पर्दाफाश केला. पोलिसांना निवेदन देऊनही कारवाई करायची नसेल तर पोलिसांचा असून नसून फायदा काय? असा संतप्त सवाल या दक्ष तरूणांनी उपस्थित केला आहे.
नालासोपारा शहराच्या पश्चिम किनारपट्टीला लाभलेले समुद्री पर्यटनासारखे सौंदर्य न्याहाळण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. मात्र पश्चिम किनारपट्टीवर उभारण्यात आलेल्या लॉजेसने विकृतीचा कळस गाठला आहे. रिसॉर्ट मालकांनीही खास पिक अप ड्रॉपसारख्या प्रकारांतून वेश्याव्यवसायाला चालना देण्याचे काम हाती घेतले आहे. चार भिंतींआड चालणारा वेश्याव्यवसाय आता काही काळावधीपासून मोकाट झाला आहे. रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड परिसर, उड्डाणपुले ही सार्वजनिक ठिकाणे आता वारांगणांच्या मुक्त वावराने कामाठीपुराच बनली आहेत. पोलिसांचे या प्रकाराकडे लक्ष असून ये? या एकाच प्रश्नाने त्यांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त होतो आहे. आमदार क्षितीज ठाकूर यांनी सादर केलेल्या निवेदनावर पोलिसांनी तातडीने कारवाई करून मोकाट वारांगणांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.