

मुंबई, 23 नोव्हेंबर : राष्ट्रवादीतून एक गट फोडून अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या शपथविधीला अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादीचे अनेक आमदार पुन्हा पक्षाकडे परतले आहेत. या आमदारांनी बंडखोरी करण्यास नकार दिला आहे.
शपथविधीला गेलेले राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे-सिंदखेडराजा, संदीप क्षीरसागर-बीड हे या दोघांसह आणखी दोन आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतले आहेत. या चार आमदारांसह अजित पवार यांच्यासोबत गेलेले आणखी काही आमदार पुन्हा राष्ट्रवादीकडे येण्याची शक्यता आहे.
‘आम्हाला काल रात्री अजित पवार यांचा फोन आला. त्यांनी आम्हाला मुंबईत येण्यास सांगितलं आणि सकाळी राजभवानाकडे घेऊन गेले. मात्र आम्हाला शपथविधीची कोणतीही कल्पना दिली नव्हती. आम्हाला ते मान्य नाही. आम्ही परत पवारसाहेंबाकडे आलो आहोत,’ असं राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगने आणि संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे काही आमदार कालपासून संपर्कात नाहीत. यामध्ये धनंजय मुंडे-परळी, नरहरी झिरवळ – दिंडोरी, दिलीप बनकर – निफाड, माणिकराव कोकाटे – सिन्नर, राजेंद्र शिंगणे, अनिल भाई दास पाटील, संदीप क्षीरसागर आणि स्वत: अजित पवार यांचा समावेश आहे. त्यामुळे सध्यातरी या आमदारांनी पक्षातून बंडखोरी केल्याचं चित्र आहे. मात्र यातील काही आमदार पुन्हा राष्ट्रवादीकडे येण्याची शक्यता आहे.
धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांसारखे राष्ट्रवादीतील मोठे नेते नक्की काय भूमिका घेणार, यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची अनेक समीकरणं ठरणार आहेत. जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे तर शरद पवार यांचे कट्टर समर्थक समजले जातात. मात्र धनंजय मुंडे आणि सुनिल तटकरे यांचे शरद पवारांसह अजित पवार यांच्यासोबतही जवळचे संबंध आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी फुटल्यानंतर हे नेते नक्की कुणासोबत जाण्याचा निर्णय घेणार, याबाबत अजूनही संभ्रम आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सत्तास्थापनेची चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी आधीही नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार यांचा पहिल्या दिवसापासून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या संयुक्त सरकारला विरोध होता. यामध्ये धनंजय मुंडे, सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल हेदेखील अजित पवारांच्या भूमिकेसोबत होते, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात अजित पवारांनंतर हे इतर नेते काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे,’ असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी फुटली, हे आता स्पष्ट झालं आहे.
भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या मदतीने त्यांनी हे सरकार स्थापन केलं आहे. अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.