
वसई/विशेष प्रतिनिधी
वसई-विरार महापालिका प्रशासनाने टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आधीच खासगी ठेकेदाराला प्रभाग समिती ‘एच’मधील रस्त्यांवरचे डिव्हायडर, झाडे आणि खांब रंगविण्याचे काम दिले आहे. कार्यादेश नसताना तसेच निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना अशा प्रकारे कामाची परवानगी देणार्या महापालिका प्रशासन व ठेका अभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाई करून वादग्रस्त ठेका अभियंता विवेक चौधरी यांची त्वरित हकालपट्टी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे वसई रोड शहर उपाध्यक्ष महेश सरवणकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
वसई-विरार शहर महापालिका प्रभाग समिती ‘एच’ नवघर-माणिकपूर बांधकाम विभागामार्फत प्रभाग समिती ‘एच’मधील मुख्य रस्त्यांवरील डिव्हाडयर, झाडे आणि पोल पेंटिंग करण्याची निविदा काढण्यात आलेली आहे. सदर निविदा प्रक्रियेची अंतिम तारीख दि. 27/11/2019 असून प्राप्त निविदा दि. 28/11/2019 रोजी उघडण्यात आल्यानंतर कमी दराच्या निविदाधारक ठेकेदाराला कार्यादेश देऊन कामाचा ठेका देण्याची प्रक्रिया क्रमप्राप्त असताना निविदा प्रक्रिया होण्याआधीच प्रभाग समिती ‘एच’मधील डिव्हायडर, झाडे व पोल पेंटिंग करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे.
प्रभाग समिती ‘एच’मधील वर्तक चौक ते पंचवटी नाका, स्टेला पेट्रोल पंप ते वर्तक चौक, बाभोळा ते स्टेला पेट्रोल पंपपर्यंत डिव्हायडर, झाडे, पोल पेंटिंग करण्याची निविदा प्रभाग समिती ‘एच’ बांधकाम विभागामार्फत दि. 18/11/2019 पासून दि. 27/11/2019 या कालावधीत निविदा फॉर्म भरण्याची प्रक्रिया असताना व त्यानंतर आलेल्या निविदा उघडण्यात येऊन कमी दराच्या निविदाधारक ठेकेदाराला कार्यादेश देऊन कामाला सुरुवात करणे बंधनकारक असताना निविदा प्रक्रिया होण्याआधीच डिव्हायडर व पोल पेंटिंगचे काम सुरू करण्यात आलेले आहे.
प्रभाग समिती ‘एच’मधील बांधकाम विभागातील प्रशासन तसेच बांधकाम विभागात गेल्या अनेक वर्षांपासून ठेका अभियंता म्हणून कार्यरत असलेले विवेक चौधरी हेच या गैरकारभाराला जबाबदार असण्याची दाट शक्यता आहे. सदर निविदा घोटाळ्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच ठेका अभियंता विवेक चौधरी यांची त्वरित हकालपट्टी करावी, असे महेश सरवणकर यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.