वसई : वसई औद्योगिक पट्ट्यातील कामगारांना दर शुक्रवार असणारी साप्ताहिक सुट्टी आता रविवार केली जाणार आहे. 1 डिसेंबर पासून याची कार्यवाही होईल असे महावितरणाने आदेश कडून कळवले आहे. त्यामुळे वसई औद्योगिक पट्ट्यात काम करणाऱ्या कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळाकडून उत्तम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मागील अनेक महिन्यांपासून भाजपा इंडस्ट्रीयल सेल कडून रितेश सत्यनाथ, विनोद कुमार, विशाल अग्रवाल, ज्योतिष नांबीयार आदी पदाधिकारी प्रयत्न करत होते. या संबंधीचे निवेदन महाराष्ट्राचे तत्कालीन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देऊन याविषयी वर चर्चा करून पाठपुरावा केला होता. विशेष करून पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी जातीने लक्ष देऊन हा विषय शासन दरबारी लावून धरला होता.
भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळाकडे यासंबंधीची अडचण अनेक कामगारांनी इंडस्ट्रीयल सेलच्या माध्यमातून बोलून दाखवली होती. शुक्रवार सुट्टी असल्याने कामगारांना आपल्या मुलांना भेटता येत नव्हते. तसेच परिवाराला वेळ देता येत नव्हता. तसेच अनेक घरगुती कार्यक्रमाना उपस्थित रहाता येत नव्हते.
भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळाचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी यावेळी बोलताना, आमच्याकडून कामगारांसाठी जी काही मदत करता येईल ती मदत इंडस्ट्रीयल सेलच्या माध्यमातून केली जाईल व हा विजय आमचा नसून वसई पट्ट्यात काम करणाऱ्या कामगारांच्या परिवाराचा आहे. त्यांच्या चेहेऱ्यावर असलेल्या आनंदासाठी भाजपा वसई रोड मंडळ हे फक्त निमित्त ठरले एवढेच! मी आमचे लाडके नेते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांचे आभार मानतो! असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *