

वसई : (प्रतिनिधी) : सर्वसामान्य नागरिकांना सुलभ आणि रास्त दरातील प्रवास करता यावा यासाठी वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने काही वर्षांपासून सुरू केलेल्या परिवहन सेवेला उद्धट आणि गैरवर्तन करणार्या चालक-वाहक तसेच कंट्रोलर यांचे ग्रहण लागल्याचे प्रभावी चित्र दिसून येते. तक्रार करणार्या नागरिकांच्या तक्रारी सोडवणे तर लांबची गोष्ट मात्र आहे त्या कामाशी इमान न ठेवता परिवहन सेवा बसेस आपल्या सातबारा उतार्यावरील भाग आहेत, असे समजून परिवहन कर्मचार्यांना उथळ कारभार सर्रास सुरू आहे. वाहक-चालक यांनी पातळी सोडली आहेच, त्यात एका जागी बसून परिवहन बसेसवर नियंत्रण ठेवणार्या कंट्रोलर (व्यवस्थापक) यांनीदेखील प्रवाशांशी असलेला कारभार कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणार्यातला आहे. त्यांच्या रोजच्या अरेरावीचा, उद्धट, गैरवर्तनाचा ताप सर्वसामान्य प्रवासी, महिला आणि प्रामुख्याने ग्रामीण भागातून शहराकडे आपला शेतमाल विकण्यासाठी येत असलेल्यरा सामान्य शेतकर्यांना, शेतमजुरांना होत आहे. परिवहन सेवा समितीच्या वरीष्ठ अधिकार्यांचे या प्रकाराकडे लक्ष नसल्याने परिवहन कर्मचार्यांची दादागिरी वाढल्याचे एका संतप्त प्रवाशाने नाव न छापण्याच्या अटीवर दै.चौफेर संघर्षला सांगीतले.
सुरूवातीला वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दींतर्गत सुरू असलेली परिवहन सेवा अधिक व्यापक करत ती पालिका क्षेत्राबाहेर विस्तारण्यात आली आहे. एस.टी.महामंडळाचे कोलमडलेले वेळापत्रक, खाजगी वाहनांची अवैध भाडेवाढ या सर्वावर महापालिका परिवहन सेवेचा उतारा सामान्य प्रवाशांसाठी सुवर्णमध्य ठरला होता. परंतु जसे जसे परिवहन सेवेला काही काळ लोटला तसेतसे या सेवेतील कर्मचार्यांनी दात दाखवायला सुरूवात केली असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. मनपा परिवहन सेवेतील बसेसवर असलेले बहुतांश चालक हे विनाप्रशिक्षित असल्याने त्यांच्या बेभरवसी वाहन चालवण्यावर कित्येक प्रवाशांचे भवितव्य अवलंबून आहे. सुरूवातीला लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या परिवहन सेवेला कर्मचार्यांच्या फाटक्या कारभाराचा डाग लागला आहे. बहुतांश चालक-वाहक हे डोक्यावर उताणे पडले असल्याच्या आविर्भावात प्रवाशांशी उद्धट वर्तन करतात. तिकीटाचे पैसे सुट्टे नसल्यास प्रवाशांशी हमरातुमरीवर येण्यापर्यंत त्यांची मजल जात असल्याचे अनेक प्रवाशांचे म्हणणे आहे. महिला, वृद्ध, विद्यार्थ्यांना या कर्मचार्यांकडून अनेकदा अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे काही प्रवाशांचे म्हणणे आहे.
सध्या वसई पश्चिम तहसील कार्यालय ते अंबाडी या लांब पल्ल्याच्या प्रवासाठी काही मोठ्या आकाराच्या गाड्यांची सोय प्रवाशांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. या गाड्या वेळेत उपलब्ध असल्या तरी अंबाडीवरून येणार्या गाड्या बर्याचदा वसई तहसील कार्यालयाकडे न पाठवता परस्पर नवघर बस आगाराजवळ असलेल्या पालिकेच्या नवघर-माणिकपूर विभागीय कार्यालयाजवळूनच पुन्हा परत फिरवल्या जातात. परिवहन कर्मचार्यांच्या या ढिसाळ आणि मनमानी कारभारामुळे परिवहन सेवा बसेसची वाट पाहत उभ्या असलेल्या वसई तहसील कार्यालयाजवळील अनेक लांब पल्ल्याच्या प्रवाशांची गैरसोय होते. वसई ग्रामीण भागातून शेतकरी मोठ्या संख्येने शहराकडे येतात. आपल्या शेतात त्यांनी पिकवलेला माल शहराकडे विकण्यासाठी ते सकाळीच पालिकेच्या बसेसने येतात. दुपारी-संध्याकाळी मात्र परिवहन कर्मचारी नखरे दाखवत मनाला वाट्टेल तसा कारभार करत असल्याने या सामान्य शेतकर्यांना एकाच जागी ताटकळत उभे राहावे लागते, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. बसेसमधून प्रवास करणार्या शेतकरी महिला, पुरूष, वृद्ध मंडळी यांच्याशी या कर्मचार्यांचे वर्तन नेहमीच वादाचे असते. किरकोळ कारणावरून ही मंडळी भांडण उकरून काढतात. परिवहन सेवेतील कर्मचार्यांच्या या बेपर्वा कारभारामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. वरीष्ठ अधिकार्यांनी याप्रश्नी कर्मचार्यांची कानउघाडणी करून त्यांना सरळ कारभार करण्याची तंबी देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.