नालासोपारा (प्रतिनिधी) :- पश्चिमेकडील उमराळे गावातील एका वसतिगृहात राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीने गुरुवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पण तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोपही तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे. नालासोपारा पोलिसांनी आत्महत्या केल्याची नोंद केली असून तिचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवला मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवला असून तो अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील उमराळे गावातील शारदा शिशु निकेतनचे शोभा जोती केंद्राचे मुलींचे वसतिगृह आहे. यामध्ये सध्या सहा मुली वसतिगृहात राहत असल्याचे कळते. याच वसतिगृहात राहणारी 17 वर्षाच्या अल्पवयीन तरुणीने गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राहत असलेल्या रूमच्या बाल्कनीमधील खिडकीला ओढणीच्या साहयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पण या घटनेची माहिती नालासोपारा पोलिसांना न सांगता तिचा मृतदेह वसतिगृहाच्या संचालिका, अधीक्षक, केअर टेकर व इतर महिला स्टाफने खाली उतरवून तिच्या घरी घेऊन गेले. नंतर तरुणीच्या नातेवाईक आणि वस्तीगृहाच्या महिला स्टाफने तिचा मृतदेह विजय नगर येथील वसई विरार महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले पण डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले होते. सदर घटनेची माहिती मिळाल्यावर नालासोपारा पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

वसतिगृहाच्या संचालिका आणि केअर टेकरवर केला गुन्हा दाखल....

17 वर्षाच्या अल्पवयीन तरुणीचा आत्महत्या केलेला मृतदेह पोलिसांना न सांगताच उतरवून तरुणीच्या घरी घेऊन जाणाऱ्या केअर टेकर, संचालिका पदमा पालित व दोन संचालकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नालासोपारा पोलिसांनी शुक्रवारी दुपारी दाखल केला आहे.

संशयास्पद मृत्यू झाल्याचा परिवाराचा आरोप…..

वसतिगृहात राहणाऱ्या 17 वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केल्यानंतर तिचा मृतदेह केअर टेकर प्रमोदिनी चव्हाण घरी घेऊन आली होती. पण ती आत्महत्या करूच शकत नाही व तिच्यासोबत काही अश्लील केले असून तिने विरोध केल्यावर तिची हत्या केली असल्याचा आरोप घरच्यांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांनी योग्य तो तपास करून आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मागणी सुद्धा केली आहे.

1) सदर तरुणीने वसतिगृहात आत्महत्या केली असून वसतिगृहातील केअर टेकर, संचालिका आणि महिला स्टाफने पोलिसांना माहिती न देता तिचा मृतदेह खाली उतरवून तिच्या घरी नेला. पोलिसांकडून ही बाब लपवली म्हणून संस्थेच्या संचालिकांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जेजे ला पाठवला असून तो अहवाल आल्यावर पुढील कारवाई करणार आहे. – वसंत लब्दे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *