

*बविआचे मुख्य गड पाडण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आदेश*
विरार : पालघर ‘लोकसभा’ निवडणुकीत ‘विधानसभे’चे गुपित दडले असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचे आदेश शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले असल्याची माहिती शिवसेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली. भविष्यात पालघर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांत ‘अतुल’नीय बदल होण्याची चिन्हे असल्याने शिवसेनेचे कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले आहेत.
पालघर मतदारसंघातील ‘युती’चे उमेदवार राजेंद्र गावित यांना आम्ही आमच्या बळावर निवडून आणूच; पण आपल्याला जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांत बदल घडवायचा आहे. त्याअनुषंगाने कार्यकर्त्यांची ताकद वाढली पाहिजे. यासाठी आपण काम करा, असे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. परिणामी कार्यकर्त्यांत बारा हत्तीचे बळ संचारले असल्याची माहितीही या पदाधिकाऱ्याने दिली.
मागील काही वर्षे जिल्ह्यात शिवसेनेचे सक्षम नेतृत्त्व नसल्याने कार्यकर्त्यांत मरगळ आली होती. वसई-विरार शहरात तर सेनेचे कार्यकर्ते नामधारी उरले होते. काही तर सत्ताधारी पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या वळचणीला गेले होते. वरिष्ठ पातळीवरूनच बळ मिळत नसल्याने कार्यकर्त्यांची कामे थांबली होती.
पण मागील दोन वर्षांत घडलेल्या घडामोडींनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे या भागाकडे लक्ष केंद्रित केले आहे. यंदाची लोकसभा निवडणूक तर ‘युती’साठी प्रतिष्ठेची झाली आहे. ‘युती’ची ताकद पाहता लोकसभेची जागा ते पदरात पाडतीलच; पण कार्यकर्त्यांचे अस्तित्व टिकवायचे तर जिल्ह्यातील सहाही विधानसभेच्या जागा आपल्या ताब्यात ठेवणे शिवसेना आणि भाजपला गरजेचे वाटू लागले आहे.
ग्रामीण भागात शिवसेनेची थोडी फार ताकद आहे. पण वसई-विरारवर संपूर्ण नियंत्रण बहुजन विकास आघाडीचे आहे. त्यातील बोईसर; नालासोपारा आणि वसई विधानसभा मतदारसंघात या पक्षाचे तीन आमदार आहेत. यातील बोईसर मतदारसंघात विलास तरे, नालासोपारा विधानसभा मतदारसंघात क्षितिज ठाकूर; तर वसई विधानसभा मतदारसंघात खुद्द हितेंद्र ठाकूर आमदार आहेत. यातील दोन जागा ‘युती’ची दुखरी नस आहेत.
आगामी काळात बहुजन विकास आघाडीचे हे गड पडायचे तर कार्यकर्त्यांत उत्साह संचारलाच पाहिजे, यासाठी आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना रसद पुरवायला सुरुवात केल्याची माहितीही या पदाधिकाऱ्याने दिली.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बैठका, सभा आणि कॉर्नर मिटिंगमधून जोरदार प्रचार सुरू ठेवला आहे. याशिवाय युतीच्या उमेदवाराची प्रचार पत्रकेही तयार असून रविवरपर्यंत ती प्रत्येक घर आणि माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम सेनेचे कार्यकर्ते पूर्ण करतील, अशी माहिती या पदाधिकाऱ्याने दिली.
माणिकपूर, वसई पश्चिम आणि वसई पूर्व पट्ट्यात युतीचेच वारे आहेत. दुसरीकडे युतीने समर्थन दिलेल्या आगरी सेनेनेही गावित यांचा प्रचार जोरात सुरू ठेवला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची पुढच्या आठवड्यात होणारी आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा पालघर जिल्हा ढवळून काढतील, असा विश्वासही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
ReplyForward |