
ठाणे दि.12 : असंघटीत कामगारांच्या वृध्दापकालीन संरक्षणासाठी व सामाजिक सुरक्षितेसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरु केली आहे. या योजनेत सहभागी होऊन असंघटीत कामगारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी श्री शिवाजी पाटील यांनी केले आहे.
यामध्ये मध्यान्न भोजन बनविणारे कामगार, रिक्षाचालक, फेरीवाले, ओझेवाले, विटकाम निर्मितीमधील कामगार, मोची, रग विक्रेते, शेतमजूर, विडी कामगार, हातमाग कामगार, चर्मकार, माथाडी कामगार, गृह उद्योग अशा अनेक प्रकारच्या असंघटीत कामगारांचा समावेश आहे.
यामध्ये १८ ते ४० वयोगटातील १५ हजार पेक्षा कमी मासिक उत्पन्न असणाऱ्या असंघटीत कामगारांना या पेन्शन योजनेमध्ये सहभाग घेता येईल. या योजनेमध्ये भविष्य निर्वाह निधी, राज्य कामगार विमा संघटन, नवीन पेन्शन योजना या योजनांचे सभासद, कामगार यामध्ये भाग घेऊ शकत नाहीत.
या योजनेसाठी आधार कार्ड,बॅकेतील बचत,जनधन खात्याचा पुरावा असणारा दस्तऐवज(खाते पुस्तिका ,धनादेश इत्यादी) समावेश आहे.ही एक ऐच्छिक व योगदान समाविष्ट असलेली योजना आहे.सदर योजने वयाची साठ वर्षे पुर्ण झाल्यावर सेवानिवृत्तांना किमान रु 3000 एवढे निश्चित मासिक निवृती वेतन प्राप्त होईल व निवृत्त वेतन धारकांच्या मृत्यूनंतर त्याच्या हयात पती/पत्नी यांना 50 टक्के कुटुंब निवृत्ती वेतन प्राप्त होईल.कुटुंब निवृत्ती वेतन केवळ पती अथवा पत्नीलाच लागू आहे.
असंघटीत कामगाराचे जवळच्या सामाईक सेवा केंद्रात आपले आधार कार्ड बॅकेतील बचत,जनधन खात्याचा पुरावा असणारा दस्तऐवज घेऊन जावे व पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेत आपल्या नावाची नोंदणी करावी.असंघटीत कामगाराला पहिल्या महिन्याचे योगदान हे रोख स्वरुपात भरावे लागेल.त्यानंतर संबंधित असंघटीत कामगाराची सहमती घेऊन स्वयंचलित पध्दतीने दरमहा त्याचे खात्यात योगदानाची रक्कम नावे टाकण्यात येईल.
देशभरातील सर्व सामायिक सेवा केंद्रांमध्ये नाव नोंदणी करण्यात येईल व राज्य तसेच केंद्र सरकारची सर्व कामगार कार्यालये,भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सर्व शाखा राज्य कामगार विमा योजना,भविष्य निर्वाह निधी संघटनेची कार्यालये हे सुविधा केंद्रे म्हणून कार्यरत असतील व संघटीत कामगारांना सदर निवृत्तीवेतनाची सर्व माहिती कार्यालयाच्या मार्फत देण्यात येईल.या योजनेच्या अधिक माहितीसाठी www.mandhan.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
जास्तीत जास्त असंघटित कामगारांनी त्यांच्या म्हातारपणाच्या संरक्षणासाठी व सामाजिक सुरक्षितेसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत जवळच्या सामान्य सेवा केंद्रात आधार क्रमांक व बँकेतील स्वत:चे खाते क्रमांक किंवा जनधन खातेक्रमांक आयएफसीकोडसह देण्याचे आवाहन श्री पाटील यांनी केले आहे.