


नागपूर / डहाणू. (प्रतिनिधी) – नुकताच झालेल्या पावसाने आणि चक्रीवादळाने मच्छीमार बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याअनुषंगाने डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड. विनोद निकोले यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री बाळासाहेब थोरात यांना लेखी निवेदनाद्वारे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
यावेळी आमदार निकोले म्हणाले की, पावसाने आणि चक्रीवादळाने मच्छीमार बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. मच्छीमारांची आर्थिक कोंडी झाली असताना शासनाकडून कोणताही पंचनामे वा नुकसान भरपाईसाठी पावले उचललेली नाहीत. पावसाळ्यानंतर 1 ऑगस्टपासून मच्छीमारी व्यवसाय करण्यास शासनाने परवानगी मच्छीमार करणाऱ्या वर्गाला देण्यात आली. त्यानुसार कोळी बांधवांनी आपल्या मच्छीमार बोटी समुद्रात मच्छीमारीसाठी पाठविल्या. मात्र नैसर्गिक पावसाच्या आपत्तीने मच्छीमारी बांधवांना मच्छी व्यवसाय करताना अडचणी येऊ लागल्या. पावसाळा संपला तरी अवेळी पडत असलेला पाऊस, क्वार आणि महा चक्रीवादळ यामुळे कोळी बंधावचा व्यवसाय ठप्प झाला आहे. चक्रीवादळ झाले असल्याने समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे मच्छीमारी बोटी बंद आहेत. तसेच माशांचा दुष्काळ असल्याने मच्छीही मिळणे कठीण झाले आहे. मोठमोठ्या मच्छीमारासोबत हातावर मच्छीचा व्यवसाय करणाऱ्या छोट्या मच्छीमार मच्छी मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ चालविताना तसेच मुलाच्या शिक्षणाचा खर्च करणेही परवडत नाही. तर मच्छीमार बोटीवर लागणार डिझेल खर्च, कर्मचाऱ्याचा खर्चही छोट्या मोठ्या मच्छीमार बोट मालकांना सहन करावा लागत आहे. शेतकऱ्याच्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे शासनाकडून सुरू झाले आहेत. मात्र मच्छीमार वर्गाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. या सर्व परिस्थितीचा शासनाने विचार करून मच्छीमार वर्गाला नुकसान भरपाई द्यावी यासाठी डहाणू तालुक्यातील कोळी बांधवांसाठी आमदार विनोद निकोले यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवेदनाद्वारे विशेष मागणी केली आहे.