तात्काळ कारवाई करण्याचे आयुक्तांना निर्देश ?

वसई(प्रतिनिधी)-वसई विरार महानगर पालिकेकडून पेल्हार विभाग प्रभाग समिती एफ मध्ये सध्या सुरू असलेली दिखावटी कारवाई बंद करून या प्रभागात
झालेल्या सर्व अनधिकृत बांधकामांवर निष्कषणात्मकारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे वसई रोड चे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. या मागणी च्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त बळीराम पवार यांना पेल्हार विभाग प्रभागातील विशेष करून उमर कंपाउंड व रिचर्ड कंपाउंड येथील अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.याठिकाणी नदीचे पात्र,शासकीय,आदिवासी, नवीन शर्थीच्या जमिनी तसेच इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक स्वरूपाच्या अनधिकृत गळ्यांचे बांधकाम झाले करण्यात आले आहे.परंतु प्रभाग समिती एफ कार्यालयाकडून सोयीस्कर हितसंबंध जपत काही मोजकीच दिखावा कारवाई केली जात आहे.दरम्यान यावर आयुक्त बळीराम पवार यांनी पुढील ४-५ दिवसांमध्ये कारवाईचे आदेश दिले जातील असे स्पष्ट केले आहे.भाजपा वसई रोड मंडळाकडून मागील आठवड्यातच यासंबंधीचे पत्र विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच पालिका आयुक्त बळीराम पवार , पेल्हार प्रभाग समिती एफ कार्यालयास दिले असल्याचे उत्तम कुमार यांनी यावेळी सांगितले. शिवाय प्रभाग समिती एफ कडून होणाऱ्या कारवायांमध्ये अर्थशास्त्र जोडले आहे का? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाचा तपास पालघर पोलिसांनी करावा अशी मागणीही उत्तम कुमार यांनी यावेळी केली. काही मोजकीच बांधकामे कशी तोडली जातात? याचा तपास पालघर पोलीस प्रशासन व आयुक्त बळीराम पवार यांनी करणे गरजेचे आहे असे ही ते म्हणाले.आयुक्त बळीराम पवार यांनी रिचर्ड कंपाउंड व उमर कंपाउंडमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामांवर जातीने लक्ष देऊन बांधकाम केलेल्या सर्व विकासकांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी उत्तम कुमार यांनी केली आहे. पुराव्यासाठी तब्बल २० छायाचित्रेही सोबत जोडली आहेत.

_____________________

 

पेल्हार प्रभागात सज्जाद व अरशद नामक व्यक्तींची दहशत-

वसई-विरार शहर महापालिकेच्या पेल्हार प्रभाग समिती क्षेत्रात सज्जाद आणि अरशद या दोन व्यक्तींनी लाख स्न्वेअर फुटांची अनधिकृतपणे मोठमोठी गोडावून उभी केली आहेत. त्यांच्या अनधिकृत बांधकामांना महापालिकेने तोडक कारवाई करण्याचे धाडस केले नाही. त्यांच्या अनधिकृत बांधकामांना बहुजन विकास आघाडीचा एक नेता संरक्षण देत असल्याची माहिती पुढे येत आहे. एकंदरीतच सज्जाद व अशरद हे महापालिका अधिकार्‍यांचे ‘जावई’ लागतात का? असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारीत आहेत.प्रतिफूट दोनशे रुपयांप्रमाणे आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांनी या बांधकाम माफियांकडून लाच घेतलेली आहे.त्यामुळे अरशद आणि सज्जाद ही मंडळी या ठिकाणी बिनधास्त पणे बेकायदा बांधकाम करीत आहेत.

 

तहसीलदारांचेही दुर्लक्ष-

नवीन शर्त, सरकार जमा, आदिवासी, गुरचरण, गावठाण अशा जमिनी भूमाफियांनी गिळंकृत करून नंतर बांधकाम माफियांना विकलेल्या आहेत. महापालिकेतील अधिकारी फुटामागे दोनशे रुपये ‘मॅनेज’ होत असल्यामुळे सरकारी जमिनी हडप करण्याचा कार्यक्रम उघडपणे सुरू आहे. विशेषत: वसईचे तहसीलदार किरण सुरवसे यांचेही या माफियांना अभय लाभत आहे. सरकारी जमीन लुटा, विका काहीही करा आम्हाला त्याचे काही सोयरसुतक नाही, अशी वसईच्या तहसील कार्यालयाची कार्यपद्धत असल्याचे दिसून येते.आजस्थितीत मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत रशीद कम्पाऊंड आणि वनोठापाडा या ठिकाणी आदिवासी जमीन कोणती? वनजमीन कोणती? गुरचरण कोणती? कोणत्या जमिनीवर किती अतिक्रमण झाले आहे? याचा तपशील जर शासनाने वसई तहसीलदारांकडे मागितला तर तहसीलदार किरण सुरवसे याबाबतीत शासनाला कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकत नाहीत. मोठमोठी औद्योगिक गोडावून बेकायदेशीर बांधताना मोठ्या प्रमाणात मातीचे भराव झालेले आहेत. मोठमोठ्या वनविभागाच्या टेकड्या खोदून जमिनीचे सपाटीकरण करण्यात आलेले आहे. महसुलाशी संबंधित अनेक बाबतीत असलेल्या गंभीर बाबीकडे तहसीलदार किरण सुरवसे यांनी दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे भूमाफिया आणि बांधकाम माफिया आपला गैरधंदा उघडपणे चालवत आहेत.

 

पालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिकेत-

वसई-विरार महापालिका प्रशासन म्हणजे एकप्रकारे शेतात असलेलं बुजगावणं असल्याचा भास शहरवासीयांना होत आहे.पालिकेच्या पेल्हार प्रभागात सध्या माफियाराज पहावयास मिळत आहे.याठिकाणी भुमाफियांनी नदीचे पात्र तसेच शासकीय जागाही गिळंकृत करून त्याठिकाणी बेकायदेशीर पणे माती भराव करून चाळी उभारल्या आहेत.विशेष म्हणजे हे सर्व पालिका व महसुल प्रशासनाच्या डोळ्यादेखत होत आहे. पण प्रशासन केवळ बघ्याची भूमिकेत असल्याचे पहावयास मिळत आहे वास्तवीक
गेल्या दोन महिन्यांत दहा लाखांहून अधिक फुटाचे बेकायदा बांधकाम होत असताना पालिकेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी साधा अहवाल मागवून घेतलेला नाही.त्यामुळे अतिक्रमण विभागप्रमुख, सहाय्यक आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि आयुक्त यांची बेकायदा बांधकामांमध्ये रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा आहे.गेल्या दहा वर्षांत वसई-विरार महापालिकेच्या अनागोंदी, लाचखोर भ्रष्ट कार्यपद्धतीमुळे पेल्हारमधील वनोठापाडा,जाबर पाडा,रिचर्ड कंपाउंड, मानीचा पाडा येथील ग्रामीण जनजीवन विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त झाले आहे. माफियांनी आदिवासींची जमीन लुटली आहे. आदिवासींची जमीन आदिवासींच्याच ताब्यात राहिलेली नाही. किंबहुना एकूण परिस्थितीत बांधकाम माफियांना अभय देऊन आर्थिक लाभ देण्याच्या नादात बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी आणि महापालिकेच्या भ्रष्ट अधिकार्‍यांनी पेल्हार, वनोठापाडा येथील विकासाच्या नावाखाली बेकायदा बांधकामांचे साम्राज्य निर्माण केले आहे.
शासनाचा पगार आणि सोयी-सुविधांचा लाभ घेऊन विकास नियंत्रण नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेत नव्याने नियुक्त झालेल्या आयुक्तांना मात्र याचे कोणतेच सोयर सुतक नसल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *