
/ डहाणू. ( प्रतिनिधी ) – डहाणू व तलासरी मध्ये सतत होत असलेल्या सौम्य व तीव्र भूकंपाचे धक्के यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. त्या अनुषंगाने शासनाने तात्काळ दखल घेऊन नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी व त्यांचे पूर्वनियोजन करावे अशी लेखी मागणी डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड. विनोद निकोले यांनी भूकंप व पुर्नवसन मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
यावेळी आमदार कॉम्रेड. निकोले म्हणाले की, डहाणू, तलासरी, दापचरी, कवाडा, उधवा, वंकास, कासा अशा अनेक गावातील घरे थरथर कापली. त्यानंतर वर्षभर सौम्य व मध्यम स्वरूपाचे शेकडो धक्के या परिसरात सातत्याने सुरूच आहेत. महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यातील किल्लारीला झालेल्या भीषण भूकंपानंतर आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसन कार्याचे सुयोग्य नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी यांत सुसूत्रता असणे किती महत्त्वाचे आहे हे प्रथमच अधोरेखित झाले. महाराष्ट्रातील किल्लारीचा भूकंप ही संपूर्ण जगासाठी आणि भारतासाठी पहिली लक्षवेधी आपत्ती ठरली. तरी देखील ही गंभीर बाब विचारात घेऊन आज पालघरमध्ये होत असलेल्या भूकंपाची गंभीर दखल का घेतली जात नाही ? डहाणू व तलासरी तालुक्यात वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे ग्रामस्थांवर मानसिक आघात केला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाच्या या हादऱ्यांनी घरांच्या भिंतींना भेगा पडल्या असून काही घरे खचली आहेत. त्या अनुषंगाने भूकंप सतत का होत आहेत त्याचे संशोधन करण्यात यावे. भूकंपाचे लहानमोठे धक्के बसत असून या धक्क्यांपासून होणारी जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने संबंधित भागात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे. पालघर जिल्ह्यात बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात यावेत, बाधित कुटूंबियांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आमदार कॉम्रेड. विनोद निकोले यांनी केली आहे.
