

वसई(प्रतिनिधी)- वसई तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांच्या अंगी कला व क्रीडा विषयक कौशल्यास प्रोत्साहन व स्पर्धात्मक संधी देण्याच्या हेतूने दरवर्षी होणारा वसई तालुक्याचा ३० वा कला -क्रीडा महोत्सवास गुरुवारपासून समारंभ पूर्वक सुरुवात होत आहे.वसईच्या नरवीर चिमाजी आप्पा क्रिकेट मैदानावर या कला-क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा सायंकाळी साडेचार वाजता नेते, प्रसिद्ध अभिनेते, ज्येष्ठ क्रीडापटू यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.१९९० मध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या महोत्सवात कला व क्रिडा विभागात एकूण ५५ हजारपेक्षा अधिक स्पर्धक सहभाग नोंदवणार आहे.या महोत्सवाच्या सोहळ्यात प्रमुख उदघाटक म्हणून प्रसिद्ध माजी क्रिकेटर कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.तसेच यावेळी महापौर प्रवीण शेट्टी,आयुक्त बी.जी.पवार या मान्यवरांसह प्रमुख पाहुणे म्हणून आमदार क्षितीज ठाकूर,आमदार राजेश पाटील,माजी खासदार बळीराम जाधव,प्रथम महापौर राजीव पाटील ,माजी महापौर नारायण मानकर, प्रथम महिला महापौर प्रवीण ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत. आमदार हितेंद्र ठाकूर हे समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत
यावर्षी या महोत्सवास बास्केटबॉल, रिंग फुटबॉल स्पर्धा व कला विभागात स्वरचित कविता वाचन या स्पर्धांचा समावेश करण्यात झाला आहे.जलतरण स्पर्धा तामतलाव येथील पालिकेच्या जलतरण तलाव,बास्केटबॉल स्पर्धा गोखिवरे येथील मधूबन कॉम्प्लेक्स तर रिंग फुटबॉल स्पर्धा नरवीर चिमाजी आप्पा मैदानात संपन्न होतील. बॉक्सिंग स्पर्धा पालघर जिल्ह्यासाठी खुली असणार आहे.शिवाय दी.२९ डिसेंबर रोजी होणाऱ्या शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये मेन फिजिक ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. कला विभागात विविध वयोगटात एकूण ३४ प्रकारच्या स्पर्धा होणार असून तेवढ्या स्पर्धा क्रीडा विभागात होणार आहेत. एकूण ६८ स्पर्धा प्रकारात स्पर्धक आपले कौशल्य सिद्ध करणार आहेत. ५५ हजार स्पर्धकातील विजेते, उपविजेते संग, वैयक्तिक क्षमतेचे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेते,उत्तेजनार्थ पात्र कलावंत व क्रीडापटूंना सहा हजार पेक्षा जास्त प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. कला व क्रीडा विभागातील सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या शाळा व संस्थांना स्वतंत्र चषक तर दोन्ही प्रकारात जास्त गुणांची कमाई करणाऱ्या शाळेत वा संस्थेस सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात येणार आहे.
या महोत्सव कालावधीत अनेक सिने कलावंत भेट देणार असून पाच मराठी चित्रपटांचे प्रमोशनही होणार आहे. ३१ डिसेंबरला या महोत्सवाचा समारोप सोहळा असून या स्थानिक नेत्यांसह वसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळाचे पदाधिकारी, अध्यक्ष वसई भूषण भाऊसाहेब मोहळ, कार्याध्यक्ष हेमंत म्हात्रे, सुरेश वायंगणकर, प्रा. द.वि. मणेरिकर,नरेंद्र चौधरी,रेमंड डिसिल्वा, जितेंद्र शहा,प्रकाश वनमाळी, संतोष वळवईकर, केवल वर्तक,मनोहर पाटील ,अनिल वाझ,ज्यूड डिसोझा,9लक्ष्मीकांत पाटील व इत्यादी मान्यवर या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या उ महोत्सवास क्रीडा विभागातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूस स्व. डी. आर.राऊत (आप्पा) स्मृती चषक तर सर्वोत्कृष्ट कलावंतास स्व. सतीश( नाना)स्मृती चषक प्रदान करण्यात येणार आहे.याशिवाय या वर्षभरात ज्या कलावंत,क्रीडापटू, साहित्यिक व पत्रकाराने राज्य,राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष पुरस्कार व यश प्राप्त केले आहे अशा गुणवंतांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. कला विभागातील स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तर काही क्रीडा विभागातील स्पर्धा समाज मंदिर व क्रीडा मंडळ सभागृहात होणार आहेत.