
राजेंद्र गावितांच्या प्रचारासाठी नालासोपाऱ्यात २४ एप्रिल रोजी जाहीर सभा

नालासोपारा(प्रतिनिधी)- पालघर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार असणाऱ्या नालासोपारा शहरावर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा आहे.या ठिकाणी मोठया प्रमाणावर उत्तर भारतीय समाज वास्तवास असून येथील उत्तर भारतीयांचा कौल निर्णायक ठरणार आहे.उत्तर भारतीयांवर यू.पी.चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा प्रभाव आहे.त्याअनुषंगाने नालासोपारा योगी आदित्यनाथ बुधवार दी.२४ एप्रिल रोजी पालघर लोकसभा मतदार संघातील युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ नालासोपाऱ्यात येत असून नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क मैदानात जाहीर सभेचे आयोजित करण्यात आली आहे.दरम्यान योगी आदित्यनाथ यांचा सभेच्या तारखांमध्ये आतापर्यंत ३ वेळा बदल करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत योगी आदित्यनाथ यांनी विरार येथील जाहीर सभेत शिवसेनेची तुलना अफजलखानाशी करत जहरी टीका केली होती. तसेच शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करत शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा पक्ष राहिला नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते.त्यावेळी हेच राजेंद्र गावित भाजपाचे उमेदवार होते. पण योगी आदित्यनाथ ज्याचा अफजलखान म्हणून उल्लेख केला होता याच शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पुन्हा वसईत येत आहेत.दुसरीकडे त्याचवेळी वसईत सभेत उद्धव ठाकरे यांनीही सभा सुरु होती.योगी आदित्यनाथ यांनी पायात चप्पल घालून छत्रपती शिवरायांना वंदन केल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती.तसेच उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथील रुग्णालयात मृत्यू पावलेल्या बालकांचे उदाहरण देत महाराष्ट्रात येऊन विकासाचे उपदेश देण्याची जरूरत नसल्याचे म्हटले होते.पण यावेळी सर्व मतभेद विसरून दोन्ही पक्ष महायुतीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. त्यामुळे आता टीका योगी आदित्यनाथ यांच्यावर अफजलखानाची उपमा दिलेल्या शिवसेना उमेदवारासाठी मतांचा जोगवा मागण्याची वेळ आली आहे.विशेष म्हणजे नालासोपारा हा स्थानिक सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचा गड मानला जातो.याठिकाणी बहुतांश नगरसेवक हे बविआचे आहे. विध्यमान महापौर हे ही नालासोपाऱ्याचेच आहेत. तसेच स्थानिक आमदारही बविआचा आहे. एकंदरीत विचार केल्यास नालासोपारा शहरात बविआ ला मानणारा मोठा वर्ग आहे.त्यातच याठिकाणी उत्तर भारतीयांचे प्राबल्य आहे. त्यामुळे नेहमीच येथील उत्तर भारतीय मतदार हा निर्णायक भूमिकेत असतो.२०१४ च्या लोकसभा तसेच पोटनिवडणुकीत येथील उत्तर भारतीय मतदारांनी भाजपाच्या बाजूने कौल दिला होता. परंतु हा मोठा वर्ग या वेळी महायुतीवर बऱ्याच कारणांमुळे नाराज आहे. शिवाय यावेळी २०१४ सारखी मोदी लाट नसल्याने तसेच भाजपाच्या उमेदवाराने शिवबंधन बांधल्याने मतदार ही संभ्रमात आहेत.त्यातच शिवसेनेकडे उत्तर भारतीय नेतृत्व नसल्याने अखेर युती कडून योगी आदित्यनाथ यांना नालासोपाऱ्यां आमंत्रित केल्याचे समजते.