तुंगारेश्‍वर पर्यटन स्थळाच्या झिजीया कराविरोधात तिव्र आंदोलनाचा इशारा ?

वसई : (प्रतिनिधी) : तुंगारेश्‍वर पर्यटन स्थळाला अभयारण्याचा दर्जा मिळाल्यानंतर याठिकाणी येणार्‍या पर्यटकांना अनेक अन्यायकारक बाबींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येते. पर्वतावर पर्यटनाव्यतिरीक्त बालयोगी सदानंद महाराज यांचा आश्रम आहे. या आश्रमाच्या माध्यमातून वर्षभर समाजप्रबोधन, बालसंस्कार शिबीरांचे आयोजन केले जाते. त्यामुळे वर्षभर पर्वतावर भाविकांचा राबता असतो. पर्वतावर अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सध्या याठिकाणी पर्यटनासाठी पर्यटकांचा राबताही असतो. मात्र त्यांच्याकडून, भाविकांकडून पर्यटन कर म्हणून पैसे वसूल केले जातात. पर्वतस्थळावर लावण्यात आलेल्या झिजिया कराविरोधात स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेकदा विधानसभा, अधिवेशनात आवाज उठवूनही अन्यायकारक झिजिया कर घेणे सुरूच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मध्यंतरी भाविकांनी तुंगारेश्‍वर पर्वतावरील मंदीराच्या दानपेटीत कराच्या पावत्या टाकून नाराजी व्यक्त केली होती. अन्यायकारक झिजिया कर तात्काळ न हटवल्यास प्रशासनाविरोधात आंदोलन उगारण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
तुंगारेश्वर पर्यटन स्थळ झिजिया कराविरोधात मागील अधिवेशनात वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर व नालासोपार्‍याचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी आवाज उठविल्यानंतर हा झिजिया कर रद्द करण्यात आला होता. मात्र दीड वर्षांपासून वनविभागाने हा पुन्हा जुलमी झिजिया कर पुन्हा सुरू केला आहे. तुंगारेश्वर पर्यटनस्थळाच्या ठिकाणी ना धड रस्ते ना इतर धड कोणत्याही सुविधा नसल्यामुळे अन्यायकारक वसूल करण्यात येणार्‍या या जुलमी कराविरोधात पर्यटकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. काही पर्यटक तर नाराजीमुळे दानपेटीत कर वसुलीच्या पावत्या टाकून आपली नाराजी व्यक्त करीत आहेत हा जुलमी कर त्वरित रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रभाग समिती जी चे माजी सभापती रमेश घोरकना यांनी दिला आहे.
मुंबई व आजुबाजूच्या परिसरात तसेच सर्वदूर तुंगारेश्‍वर पर्यटनस्थळाची ख्याती आहे. पावसाळा, हिवाळा या दोन ऋतूंत तर पर्यटक मोठ्या संख्येने याठिकाणी पर्यटनासाठी येतात. तुंगारेश्‍वर पर्वतावर असलेला बालयोगी श्री सदानंद महाराजांचा आश्रम भाविकांच्या भक्तीचे केंद्रबिंदू आहे. त्यामुळे वर्षभर भाविक याठिकाणी येत असतात. मात्र त्यांच्याकडूनही पर्यटन कर रूपये 48 इतका आकारला जात असल्याने त्यांच्यात नाराजी व्यक्त होत आहे. सदरचा अन्यायकारक कर वन विभागाने तात्काळ घेणे बंद करावे, अन्यथा त्यांना मोठ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल. असा इशारा माजी सभापती रमेश घोरकना यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *