‍‎

नालासोपारा (प्रतिनिधी) :- पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या आणि सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या तुंगारेश्वर मंदिरात येणाऱ्या भक्तांकडून आणि तुंगारेश्वर अभयारण्य फिरायला येणाऱ्या लोकांकडून आणि ग्रुप कडून 12 वर्षाच्या वरील मुलांकडून 48 रुपयाच्या नावाखाली प्रवेश कर घेतला जात असल्याने लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तर सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक रमेश घोरकाना हे या विरोधात लवकरच आमरण उपोषण करणार आहे.

तुंगारेश्‍वर पर्यटन स्थळाला अभयारण्याचा दर्जा मिळाल्यानंतर याठिकाणी येणार्‍या पर्यटकांना अनेक अन्यायकारक बाबींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येते.  पर्वतावर पर्यटनाव्यतिरीक्त बालयोगी सदानंद महाराज यांचा आश्रम आहे. या आश्रमाच्या माध्यमातून वर्षभर समाजप्रबोधन, बालसंस्कार शिबीरांचे आयोजन केले जाते. त्यामुळे वर्षभर पर्वतावर भाविकांचा राबता असतो. पर्वतावर अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सध्या याठिकाणी पर्यटनासाठी पर्यटकांचा राबताही असतो. मात्र त्यांच्याकडून, भाविकांकडून पर्यटन कर म्हणून पैसे वसूल केले जातात. पर्वतस्थळावर लावण्यात आलेल्या झिजिया कराविरोधात स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेकदा विधानसभा, अधिवेशनात आवाज उठवूनही अन्यायकारक झिजिया कर घेणे सुरूच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मध्यंतरी भाविकांनी तुंगारेश्‍वर पर्वतावरील मंदीराच्या दानपेटीत कराच्या पावत्या टाकून नाराजी व्यक्त केली होती.

वसईतील पुराणप्रसिद्ध श्री तुंगारेश्वर महादेव व परशुराम तीर्थ येथे हजारो वर्षांपासून लाखो भाविक दर्शनास येतात. राज्य सरकारच्या वन विभागाने येथे येणाऱ्या भाविकांकडून प्रत्येकी 48 रुपये कर आकारण्यास सुरुवात केली आहे. प्रवेश शुल्क भरला नाही तर देवाचे दर्शन घेता येणार नाही असा जाचक हुकूम लादण्यात आला आहे ! त्यामुळे सर्वत्र असंतोषाचे व रोषाचे वातावरण आहे. सर्व स्तरातून याचा निषेध व्यक्त होत आहे. स्वतंत्र भारतात राहत आहोत की धर्मांध व जुलमी मोघलांच्या राज्यात असा प्रश्न काहि जणांना पडला आहे.

वनविभाग अस्तित्वात येण्याआधीपासून तुंगारेश्वर हे प्रसिद्ध मंदिर तुंगारेश्वर अभयारण्यात आहे. वसई तालुक्यातील प्रसिद्ध असे शंकराचे मंदिर येथे असून सोमवारी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येथे येतात. तसेच याठिकाणी सदानंद महाराज यांचेही आश्रम आहे. वसई मार्गाने याठिकाणी येणाऱ्या भाविकांची प्रवेश शुल्काच्या नावावर अक्षरशः लूट केली जात असल्याची चर्चा आहे. या आश्रमामध्ये औषधी उपचार आणि वनौषधी दिली जात असल्यामुळे रुग्ण सुद्धा याठिकाणी येतात. सरकार आणि वनविभाग 48 रुपयांच्या नावावर घेणाऱ्या प्रवेश शुल्क घेऊन येणाऱ्या लोकांसाठी काय सुविधा देतात. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी शोचालय सुद्धा बांधलेले नाही. 48 रुपयांमध्ये काही सुविधा देत नाही मग कर कसला घेता हा प्रश्न येणाऱ्या नागरिकांच्या मनात पडला आहे.

बंद केलेला प्रवेश शुल्क पुन्हा सुरू…….

आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि तत्कालीन आमदार विलास तरे यांनी भाविकांच्या भावना लक्षात घेऊन आणि या जाचक प्रवेश शुल्का विरोधात आवाज उठवण्यात आला होता. मात्र दीड वर्षांपासून वनविभागाने हा पुन्हा जुलमी झिजिया कर पुन्हा सुरू केला आहे. तुंगारेश्वर पर्यटनस्थळाच्या ठिकाणी ना धड रस्ते ना इतर धड कोणत्याही सुविधा नसल्यामुळे अन्यायकारक वसूल करण्यात येणार्‍या या जुलमी कराविरोधात पर्यटकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. काही पर्यटक तर नाराजीमुळे दानपेटीत कर वसुलीच्या पावत्या टाकून आपली नाराजी व्यक्त करीत आहेत हा जुलमी कर त्वरित रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रभाग समिती जी चे माजी सभापती रमेश घोरकना यांनी दिला आहे. त्यावेळी शुल्क 36 रुपये होते या तिघा आमदारांनी आवाज उचलल्यावर प्रवेश शुल्क बंद केले होते पण वनविभागाचे अधिकारी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटल्यानंतर प्रवेश शुल्क पुन्हा सुरू केले असून त्याचे पैसे वाढले असून आता फॉरेस्ट विभाग 48 रुपये प्रमाणे प्रवेश शुल्क घेत आहेत.

 

1) आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी प्रवेश शुल्का बाबत आवाज उचलल्यावर वनविभागाने बंद केले होते पण परत त्यांनी प्रवेश शुल्क परत सुरू केल्याने याविरोधात लवकरच आमरण उपोषणला बसणार आहे. प्रवेश शुल्क घेऊन सुद्धा रस्ता, पिण्याचे पाणी, स्वछता गृह याची कोणतीही मूलभूत सुविधा देत नसल्याने नेमके पैशाचे वनविभाग काय करतात ? – रमेश घोरकाना (नगरसेवक, बविआ)

2) अनेक वेळा पत्रव्यवहार केला पण काहीही उपयोग नाही. प्रवेश शुल्काच्या नावावर 48 रुपये आमच्या भाविकांकडून घेतला जातो. काहीही सुविधा देत नाही मग कर कसला घेता ? भाविक कमी येत असल्यामुळे आमच्या मंदिराच्या दानपेटीत देणगी कमी होत आहे.  सरकारने या मंदिराकडे दुर्लक्ष केले असून एकही पैसा दिलेला नाही. मंदिराचा खर्च आणि येण्याजाण्यासाठीचा रस्ता सुद्धा मंदिर प्रशासन या देणगीतून करत आहे. – पुरुषोत्तम पाटील (अध्यक्ष, तुंगारेश्वर देवस्थान)

3) शंकराचे प्रसिद्ध मंदिर, कुंड आणि सदानंद महाराज यांचे आश्रम असल्यामुळे आम्ही नेहमी तुंगारेश्वरला जातो. पण कोणतीही सुविधा नसलेल्या आणि भाविकांकडून प्रवेश शुल्काच्या नावाखाली सुरु असलेली लूट कधी थांबणार ? सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? – नितेश रोखीत (भाविक)

प्रवेश शुल्क 48 रुपयांच्या नावाखाली लोकांकडून वसुली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *