


दादासाहेब गायकवाड हे समाजात एकरूप होऊन सर्वसामान्य माणसाचे जीवन जगत होते. दादासाहेबांचा पेहराव अत्यंत साधा होता. पायात वहाणा, अंगात सदरा-धोतर व त्यावर कोट, डोक्यावर टोकदार निळी टोपी आणि हातातील पिशवीत काही कागदपत्रे, अशा पेहरावात फिरणारा हा रांगडा पैलवान आजही दलित चळवळीच्या देदीप्यमान इतिहासातील हीरो ठरतो.अतिशय दुर्दम्य इच्छाशक्ती व आशावाद दादासाहेबांच्या ठायी भरलेला होता. ते म्हणायचे, ‘‘श्रमिकांच्या जीवनातील मी एक साधा मजूर आहे. आम्हाला अविश्रांत असे श्रम घेऊन आमच्या राष्ट्राची शेती निढळाच्या घामाने फुलवता आली पाहिजे. अंगभर वस्त्र लाभून देशाचेही अंग आम्हाला झाकता आले पाहिजे. विविध उद्योगधंदे वाढीस लागून आमचा देश समृद्धशाली बनला पाहिजे.’’
कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे अत्यंत नि:स्वार्थी व त्यागी प्रवृत्तीचे मूर्तिमंत व्यक्तिमत्त्व होते. सार्वजनिक जीवनात आपले चारित्र्य स्वच्छ असावे. समाजाकडून जमा होणा-या पैशांची उधळपट्टी करू नये. यावर त्यांचा कटाक्ष होता. अनेक वेळा रेल्वे स्टेशनच्या बाकावर पथारी टाकून त्यांनी रात्र काढली; परंतु हॉटेलवर पैसे उधळले नाहीत. दिल्लीत १५ वर्षे दादासाहेब खासदार होते; परंतु आयुष्यात स्वत:च्या मालकीचे घर केले नाही. आलेले सर्व वेतन त्यांनी नाशिकच्या रमाबाई विद्यार्थी वसतिगृहास न चुकता दर महिन्याला पाठवले. एवढेच नव्हे तर आयुष्याच्या शेवटी बँकेतील जमा रु. ६००० रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहास दान देऊन शिल्लक शून्य ठेवली.
दादासाहेबांनी आपल्या स्वत:च्या वागणुकीतून अनेक आदर्श निर्माण केले. सामाजिक कार्य करताना खेडय़ापाडय़ांतून फिरताना आपल्या गोरगरीब बांधवांना जेवणाचा बोजा नको म्हणून ‘‘मागच्या गावांहून जेवून आलोय’’ असे खोटेच सांगून पुढे प्रवासात वेळ मिळाल्यावर कुठे तरी नदीकाठी जेवून घेत. अथवा कोटाच्या खिशात असलेले गूळ शेंगदाणे खाऊन वेळ मारून नेत. पैसे खर्च होऊ नयेत किंवा इतरांना भरुदड पडू नये, म्हणून दादासाहेब हे कधी पायी तर कधी सायकल, घोडागाडी किंवा बैलगाडीतून प्रवास करीत. समाजकार्याची मुळातच आवड असल्याने १९२४मध्ये वयाच्या २२व्या वर्षी शाहू छत्रपती बोर्डिगमध्ये अधीक्षक पदाची सूत्रे घेऊन त्यांनी समाजसेवा सुरू केली. समाजसेवेची आवड असल्याने बगदाद येथे ५०० रुपयांची नोकरी लाथाडून अवघ्या २० रुपयांच्या मासिक मानधनावर नोकरी पत्करली.
१९२६मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाशिक येथे गेले होते. त्या वेळी त्यांचा मुक्काम शाहू छत्रपती बोर्डिगमध्ये होता. तेथे दादासाहेबांचा बाबासाहेबांशी प्रथम परिचय झाला. डॉ. बाबासाहेबांचे आकर्षक व्यक्तिमत्त्व व प्रचंड विद्वत्ता पाहून ते भारावून गेले. डॉ. बाबासाहेबांना काय हवे व काय नको ही सारी व्यवस्था दादासाहेबांनी व्यक्तिश: लक्ष देऊन केली. डॉ. बाबासाहेबांनी चाणाक्ष नजरेने दादासाहेबांची ‘एक हरहुन्नरी, साहसी, जिद्दी, महत्त्वाकांक्षी व सामाजिक सेवेची आवड असणारा तरुण’ अशी प्रतिमा केव्हाच टिपली होती. दादासाहेबांनीही बाबासाहेबांना आपल्या मनोमनी कधीच त्यांना आपले गुरू करून टाकले होते. पुढे ही गुरू-शिष्याची जोडी सामाजिक व राजकीय क्षितिजावर दलितांच्या उद्धारासाठी जवळपास ३० वर्षे संघर्ष करीत राहिली व दलितांच्या संघर्षमय इतिहासात अजरामर झाली. डॉ. बाबासाहेबांच्या परिसस्पर्शाने पूनित झालेली दादासाहेबांची प्रतिमा १०० नंबरी सोन्यासारखी उजळून निघाली व डॉ. बाबासाहेबांच्या पश्चात पुढे दलित समाजाला दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरली.
दादासाहेब हे जनमानसातील लोकनेते होते. मनुष्य स्वभावाचे अचूक निदान, प्रेमाने माणसे सांभाळण्याची कला व प्रसंगी शत्रूलाही नामोहरम करण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी होते. थोरामोठय़ांच्या सहवासात त्यांचा खूप आदर व्हायचा. यशवंतराव चव्हाण तर त्यांना थोरल्या भावासारखे मानत. लक्ष्मीबाई टिळकांचे तर ते मानसपुत्र होते. कवी कुसुमाग्रजांचे ते कौटुंबिक मित्र होते. दादासाहेब हे अतिशय कळकळीने व आस्थेने गरिबांचे प्रश्न समजून घेत, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत. पोटतिडकीने व जिव्हाळ्याने मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडत. विधानसभेतील व लोकसभेतील त्यांची भाषणे म्हणजे अस्खलीत वक्र्तृत्वाचा उत्कृष्ट नमुना होता.
परदेशातून शिकून आलेल्या उच्चविद्याविभूषित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरच कोणत्याही विद्यापीठाची पदवी न घेतलेल्या दादासाहेबांनी डॉ. बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान सोप्या भाषेत खोडय़ापाडय़ांतील लोकांच्या घरांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य केले. सहा डिसेंबर १९५६ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. दलित समाज तर पूर्णत: उद्ध्वस्त झाला होता. आता दलित समाजाचे पुढे काय होणार, हाच सर्वापुढे प्रश्न होता. अशा कठीण प्रसंगी दादासाहेब धिरोदात्तपणे डॉ. बाबासाहेबांच्या चितेला साक्षी ठेवून म्हणाले, ‘‘बाबासाहेब तुम्ही आम्हाला अनाथ करून गेलात, पण मी आपल्या समाजाला कधीच अंतर देणार नाही.’’ दादासाहेब वचनाचे पक्के असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर हवालदिल व पोरक्या झालेल्या दलित समाजाला दादासाहेबांनी अत्यंत समर्थ व प्रबळ नेतृत्व दिले.
१९५९ व १९६४मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला देशव्यापी भूमिहीनांचा विराट सत्याग्रह ‘न भूतो न भविष्यति’ असाच होता. भूमिहीनांच्या सत्याग्रहप्रसंगी कसेल त्याची जमीन, पण नसेल त्याचे काय? असा नेमका प्रश्न उपस्थित करून दादासाहेबांनी चमत्कार घडवून आणला. देशभरातून जवळपास तीन लाख चाळीस हजार सत्याग्रही तुरुंगात गेले. तुरुंग अपुरे पडू लागले होते. हा सत्याग्रह म्हणजे दादासाहेबांच्या शिरपेचातील मानाचा तुरा होय.
दादासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष करून जनहिताची व दलितोद्धाराची कामे केली. अनेकांना रोजगार मिळवून देऊन त्यांचे संसार थाटून दिले. अनेकांना बढत्या देऊन त्यांना मोक्याच्या जागा मिळवून दिल्यात. गरीब मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून शिक्षणसंस्था व वसतिगृह सुरू केली. १९६७मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर राजकीय समझोता करून संबंध देशात महाराष्ट्रात पहिल्यांदा बौद्धांना सवलती मिळवून दिल्यात. समान कार्यक्रम आखून दलित चळवळ गतिमान केली. अनेक नेत्यांना उच्चपदी बसवून रिपब्लिकन पक्षाचे नाव रोशन केले. लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नामवंतांची वर्णी लावली. रिपब्लिकन पक्षाला राजकीय प्रतिष्ठा मिळवून पुढे अनेकांच्या आयुष्याचे सोने केले. स्वत:च्या कौशल्याने दिल्ली येथे लोकसभेच्या समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारून घेतला. नागपूरच्या दीक्षाभूमीसाठी १४ एकर जागा मिळवून देऊन त्या ठिकाणी भव्य विहार, पुतळा, कला व वाणिज्य महाविद्यालय सुरू केले. चैत्यभूमी दादर येथे जागा मिळवून देण्याची किमया ही दादासाहेबांचीच. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून लोकांनी त्यांना सन्मानाने ‘कर्मवीर’ हा किताब बहाल केला. भारत सरकारनेही त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
दादासाहेबांचा जन्म १५ ऑक्टोबर १९०२ रोजी नाशिक जिल्ह्यातील आंबेगावी एका सधन कुटुंबात झाला. आयुष्यभर दलितांच्या उद्धारासाठी झटलेला हा माणूस स्वत:चे दु:ख व वेदना लपवून २९ डिसेंबर १९७१ रोजी सा-या दलित-शोषित, कष्टकरी समाजाला पोरका करून गेला. एका झंझावती संघर्षमय जीवनाची अशा त-हेने पूर्णाहुती झाली. ती ख-या अर्थाने समर्पित जीवनाची आहुती होती. त्यांच्या मृत्यूमुळे आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचा तारा निखळला व कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. अशा या झुंझार गौरवशाली लोकनेत्यास त्यांच्या ४८ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन .