
नालासोपारा (प्रतिनिधी) :- गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही अशी चर्चा सर्वसामान्य लोकांमधे सुरू असताना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास याचा प्रत्यय म्हणून वसई पूर्वेकडील जूचंद्र गावातील श्री ग्रामदेवी ( श्री चंडिका देवी) मंदिराचा दरवाजा तोडून दानपेटी मधील पैश्यावर चोरांनी डल्ला मारला असून देवीचे दागिने सुद्धा चोरी करून वालीव पोलिसांना जणू आव्हान दिले आहे. वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री साडे नऊ ते शनिवारी पहाटे सव्वा पाचच्या दरम्यान चोरट्यांनी जूचंद्र गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या श्री ग्रामदेवी ( श्री चंडिका देवी) मंदिराचा बंद दरवाजाचा कडी कोंडा तोडून मंदिरात प्रवेश करून देवाच्या दानपेटीमधील अंदाजित 15 हजारांची चिल्लर आणि नोटा, 1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 1 ग्रॅम सोन्याची देवीची टिकली, एक चांदीचा गणपती, एक चांदीचा छोटा पाळणा, 50 ग्रॅम वजनाचे देवीच्या पायातील चांदीचे पैंजण असा मुद्देमाल चोरी करून नेला आहे. मंदिरात चोरी झाल्याचे हरिहर आत्माराम पाटील (58) यांनी शनिवारी तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जर देवच सुरक्षित नाही तर सामान्य जनता काय सुरक्षित पोलिस ठेवतील हां प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
