

विरार : (प्रतिनिधी) : दोन वेगवेगळ्या घटनेत हत्या करून फरार झालेल्या चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात विरार पोलिसांना यश आले आहे. सदर आरोपींना अटक करण्यात आलि असून विरार पोलीस पुढील तपास करित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत दि. 15 डिसेंबर 2019 रोजी दोन अज्ञात इसमांनी कुंभारपाडा येथील रिद्धीसिद्धी इलेक्ट्रॉनिक्स व स्टेशनरी, मोबाईल रिपेरिंग या दुकानात येऊन दुकानदारांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात एका दुकानदाराचा मृत्यू झाला होता. तर विजयकुमार गुप्ता हा जखमी झाला होता. यावेळी दरोडेखोरांनी दुकानातील सुमारे अडीच लाख रूपयांची रोकड लंपास केली होती. घटना घडली त्यावेळी नागरिकांच्या सतर्कतमुळे एका दरोडेखोराला पकडण्यात यश आले होते. तर अन्य दरोडेखोर फरार झाले होते. विरार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून मारेकर्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोलिसांनी केलेल्या शोधमोहिमेला अखेर यश येऊन आरोपी अनिल साखर शिंदे (वय 32 वर्ष), अभय नेवाल विश्वकर्मा (वय 20 वर्ष) यांना दि. 17 डिसेंबर 2019 रोजी अटक करण्यात आली. सदर आरोपींकडून एक छोटी लोखंडी गावठी बंदूक, 4 पितळी धातुचे जिवंत गावठी काडतुस, एक काळ्या रंगाची 3 कप्पे असलेली सॅगबॅग, एक होंडा शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे करित आहेत.
तर दुसर्या घटनेत चोरीच्या उद्देशाने झालेल्या वृद्धेच्या हत्येचा उलघडा झाला असून एका आरोपीला अटक करण्यात विरार पोलिसांना यश आले आहे. दि. 27 डिसेंबर 2019 रोजी मनिषा मनोहर डोंबल (वय 63 वर्ष) या विराट नगर येथील घरी असताना कोण्याती अज्ञात इसमाने चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसून त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असता पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. ज्यादिवशी घटना घडली त्यादिवशी सदर परिसरात यश प्रभाकर इंदवटकर, विनयकुमार गोपी टानेटी, विनोद पाडवी यांची नावे समजली. या तिघांचा पोलिसांनी शोध घेतला असता यश आणि विनयकुमार हे पोलिसांच्या ताब्यात सापडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता चोरीच्या उद्देशाने त्यांनीच मनिषा डोंबळ यांच्या छातीत सुरा खुपसून त्यांचा खुन केल्याची व घरातील सुमारे 7 लाख 28 हजार 280 रूपये चोरून नेल्याची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे पुढील तपास करित आहेत.