
नालासोपाऱा ता.२ (एस. रहमान शेख) लोकसंख्या वाढीचे प्रमाण आणि आपल्याकडे उपलब्ध असणारे पोलीस बळ याचा ताळमेळ बसविणे अवघड काम. अशाही परिस्थितीत आपले अधिकारी व कर्मचारी आपला कारभार नीट सांभाळत आहेत.
पण आता लवकरच पोलीस आयुक्तालय येत असल्याने आपले मनुष्यबळ आणि साधनसामग्री यात चांगली वाढ होणार आहे. नागरिकांनी त्या बाबत निश्चिंत रहावे असे आवाहन आज वसई विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी येथे केले.
पालघर पोलीस विभागाच्या
” रेझिंग डे सप्ताह “उपक्रमाचे आज संध्याकाळी नालासोपाऱा पोलीस ठाण्यात उदघाटन झाले.
या प्रसंगी ते उपस्थितांशी बोलत होते. विभागीय पोलीस अधिकारी
डॉ. अश्विनी पाटील (वसई ) रेणुका बागडे ( विरार.)अमोल मांडवे (नालासोपाऱा.)
आणि विभागातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर होते.
शहीद जवान संदीप सावंत आणि अर्जुन थापा यांना श्रद्धांजली व म.ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस
आदरांजली अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
आपल्या प्रमुख भाषणात विजयकांत सागर पुढे म्हणाले की
हा सप्ताह विविध सत्रात विभागून होणार असून या निमित्ताने विद्यार्थी, युवक, युवती, महिला आणि ज्येष्ठ नागरिक या समाजगटांना समाविष्ट करण्यात आले आहे.
या सर्वांना पोलिसांचे दैनंदिन कामकाज, शस्त्रे ,नवे कायदे, स्वसंरक्षण, खबरदारी, आणि न्याय्य हक्क या संदर्भात योग्य ती माहिती दिली जाईल. जागृती केली जाईल.
बेकायदेशीरपणे विदेशी नागरिक इकडे येतात, स्थिरावतात, वाहने घेतात आणि वर कायदा मानत नाहीत अशांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार आहे.
आपणच अशांना अधिक मोबदला मिळतोय म्हणून घरे भाड्याने देत आहोत, छोटीमोठी वाहने देत आहोत हे योग्य आहे का ? आता परदेशी नागरिकांची माहिती लपविणाऱ्या वा आश्रय देणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल केले जाते आहेत.
या समस्या आपण सारे मिळून दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
डॉ. अश्विनी पाटील यांनी पोलीस दलाच्या स्थापनेचा इतिहास सांगितला.
दोन जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलीस खात्याला स्वतंत्र ध्वज मिळाला. आणि तेव्हा पासून पोलीस खाते आणि नागरिक यांच्यात जवळीक निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
त्यासाठी विविध नागरी-अनागरी समित्या स्थापन करण्यात आल्या. उपक्रम हाती घेण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना नागरिकांची गरज आणि नागरिकांना पोलिसांची गरज असते.
मुली, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या भल्यासाठी काही नवे कायदे करण्यात आले आहेत. याची माहिती समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचली पाहिजे. या हेतूने हा सप्ताह होत असल्याने तो यशस्वी होईल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डी.वा.एस.पी. रेणुका बागडे यांनी सुद्धा आपल्या प्रास्ताविकात आगामी काळात नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करत रहावे आणि हा सप्ताह यशस्वी करावा असे आवाहन केले.
या उदघाटन सोहळ्यात नालासोपाऱा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिक, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, तटरक्षक दलाचे सदस्य, पोलीस पाटील, मोहल्ला कमिटी मेंबर्स, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार सहभागी झाले होते.
या सोहळ्याचे नेटके सूत्रसंचलन वाहतूक पोलीस कर्मचारी राजेश गायकवाड यांनी केले. नालासोपाऱा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी आभार प्रदर्शन केले.
दरम्यान या सप्ताहात या भागात ज्यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावली आणि पोलिसांना भरीव सहकार्य दिले अशांचा वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.