नालासोपारा (प्रतिनिधी) :- पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या आरोपी पतीने दुसऱ्या पत्नीचा गळा दाबून खून केलेला मृतदेह गोणीत भरून मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातीवली गावातील जंगलात फेकून दिल्यानंतर काही महिन्यांनी फक्त सांगाडा पोलिसांना सापडल्यावर वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. ठाण्याच्या पोलिसांनी या सांगाड्याचे गूढ तब्बल 9 महिन्यांनी उकलून आरोपी पतीला ठाणे रेल्वेस्थानकातून अटक करून वालीव पोलिसांना त्याचा ताबा दिला आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या जवळ सातीवली गावाच्या वनजमिनीवर काजूच्या झाडाजवळ गुरुवारी 21 मार्चला रंगपंचमीच्या दिवशीच सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा सांगाडा गोणीमध्ये सापडल्याने संपूर्ण विभागात खळबळ माजली होती. वालीव पोलिसांनी खुनाचा गुन्हा आणि पुरावा नष्ट केला म्हणून आरोपी विरोधात गुन्हा 22 मार्चला दाखल केला होता. तेव्हापासून हा गुन्हा उघड झाला नव्हता. ठाणे क्राईम युनिट 1 च्या पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना माहितिदाराने या हत्येबाबत माहिती दिल्यावर आरोपीला मोठ्या शिताफीने अटक करून वालीव पोलिसांना मंगळवारी ताबा दिला आहे. वालीव पोलिसांनी चौकशी केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली की, दुसऱ्या पत्नीची पहिल्या पत्नीसोबत नेहमी भांडण व्हायची, म्हणून दुसऱ्या पत्नीला गळा दाबून तिचा खून करून मृतदेह फेकून दिला होता. नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील साईपुजा बिल्डिंगमधील डी/1 मध्ये आरोपी पती महाबुबुर रेहमान आझाद झानान शेख (45) हा पहिली पत्नी सीमा शेख आणि दुसरी पत्नी पॉली शेख (21) हिच्यासोबत भाड्याने राहत होता. ऑक्टोबर 2018 महिन्यातील एका दिवशी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास जेवण्यास बसला असताना दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीसोबत भांडण झाले होते. तेव्हा रागाच्या भरात आरोपी पतीने दुसऱ्या पत्नीचा गळा दाबून खून करून तिचा मृतदेह गोणीत भरून ठेवला. दुसऱ्या दिवशी घर खाली करून बाजूलाच असलेल्या टेंपो चालक शाका उर्फ राजू अमीन पिटमी याच्या टेंपोमधून घरातील सामान घेऊन गेला. वाटेतच मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातीवली गावातील जंगलात ती मृतदेहाची गोणी फेकून दिली होती. त्यानंतर आरोपी पहिल्या पत्नीसह बांगलादेशला पळून गेला होता. तब्बल 5 महिन्यांनी वालीव पोलिसांना महिलेचा सांगाडा असलेला गोणीमधील मृतदेह 21 मार्चला आढळला होता.

1) दुसऱ्या पत्नीची गळा दाबून हत्या करून मृतदेह सातीवली येथील जंगलात फेकणाऱ्या आरोपी पतीला अटक केली असून त्याला बुधवारी वसई न्यायालयात हजर केले असता आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. – अनंत पराड (पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी, वालीव पोलीस ठाणे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *